कोलंबो । भारताचा कर्णधार विराट कोहली (53), लोकेश राहुल (54), रोहित शर्मा (38) आणि शिखर धवनने (41) अध्यक्षीय संघाविरुद्धच्या दोन दिवसीय सराव सामन्याच्या दुसर्या आणि शेवटच्या दिवशी चांगली फलंदाजी करत संघाला आघाडी मिळवून दिली. हा सामना अनिर्णित राहिला. भारताने पहिल्या दिवशी यजमान संघाला 187 धावांवर गुंडळले. त्यानंतर भारतीय संघाने 68 षटकांमध्ये नऊ विकेट्सच्या मोबदल्यात 312 धावा केल्या. भारतीय डावात सलामीवरी राहुल लोकेशने 54 आणि विराटने 53 धावा केल्या. पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने 30 षटकांमध्ये 3 बाद 135 धावा केल्या होत्या. त्यावेळी भारतीय संघ 52 धावांनी पिछाडीवर होता. शनीवारी सकाळी विराट आणि अजिंक्य रहाणेने डावाची सुरुवात केली. अर्धशतक झाल्यावर कोहलीने 53 धावांवर निवृत्ती घेतली. त्यापाठोपाठ रहाणेही 40 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला.
रोहितने छाप पाडली
दुखापतीनंतर मायदेशातील मालिकेला मुकलेल्या रोहित शर्माने 49 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकार लगावत 38 धावा केल्या. फिटनेसच्या मुद्दावरुन रोहितही सामन्यात रिटायर्ड हर्ट झाला. मुरली विजयच्या जागी संघात आलेल्या शिखर धवनही 41 धावा झाल्यावर तंबूत परतला. विकेटकिपर रिद्धीमान सहा 36 धावा काढून नाबाद राहिला. टी कौशलच्या गोलंदाजीवर किथुरवानकडे झेल देऊन सहा बाद झाला तर जडेजाची विकेटही कौशलने मिळवली.