ठाणे । नुकत्याच 14 ते 17 जूनदरम्यान एमआयटी विश्वविद्यालयाच्या प्रांगणात लोणी – काळभोर, जिल्हा पुणे येथे पार पडलेल्या 5 व्या कुमार गटातील मुलांच्या महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्ह्याच्या राहुल सिंगने सुवर्णपदक पटकावले. राहुल सिंग हा 48 – 50 किलो वजनी गटात खेळत होता. त्याला महाराष्ट्रातील 8 निवडक प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान होते. त्याला उपउपान्त्य फेरीतच सर्वात दिग्गज मानल्या जाणार्या व घरच्या मैदानात खेळणार्या पुणे महानगराच्या अंशुल चव्हाणचे आव्हान होते पण राहुल सिंगने त्याला आपल्या लेफ्ट – राईट स्ट्रेट व पाठोपाठ लेफ्ट हूक ह्या शैलीने 1 ल्याच फेरीतमध्ये गारद केले. राहुल सिंगच्या ठोसांच्या प्रहार एवढा प्रखर होता की त्याची नोंद रिंगणातील पंचाना घेणे भाग पडले व प्रतिस्पर्ध्याला पुढील पडणार्या मारापासून वाचवण्यासाठी पंचाना लढत अवघ्या 110 सेकंदात थांबवावी लागली.
विजयाने राहुल सिंगचा आत्मविश्वास तर दुणावला होताच पण त्याच्या बरोबरच्या प्रशिक्षक आकाश म्हाळगी यांनी त्याला उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्ध्यांच्या काही त्रुटी नजरेस आणून दिल्या व त्याचा फायदा घेत आपण कशी लढत जिंकली पाहिजे ह्याचे मार्गदर्शन केले. राहुल सिंगने देखील एका उत्तम विद्यार्थाचा परिचय देत ह्या सल्ल्यावर काम करत सांघिक विजेतेपद पटकावणार्या सातारा संघातील सुमित घाडगे ह्यावर उजव्या ठोसांच्या भडीमार करत पुन्हा एकदा रिंगणातील पंचाना लढत थांबिविण्यास भाग पडले व अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत राहुल सिंगची गाठ मुंबई उपनगरच्या विकी कुमावत या बॉक्सर्सशी पडली. अंतिम फेरी असल्याने पूर्ण जीव लावण्याचे बाळकडू राहुलचे प्रशिक्षक आकाश म्हाळगीने दिलेच होते. राहुलने अंतिम फेरीची लढत सुरू झाल्या क्षणापासून त्याने प्रतिस्पर्ध्याला चढाई करायची संधीच दिली नाही व आपले बॉक्सिंग कौशल्य सरस आहे हे सिध्द करायला त्याने अवघा मिनिटभरचा अवधी घेतला. ह्या लढतीत देखील त्याचे प्रखर ठोसांचे तंत्र हीच त्याची उजवी बाजू होती. राहुलचे ठोसे इतके शक्तीशाली होते की त्याची नोंद घेत रिंगणातील पंचाना लढत 1 ल्याच फेरीमध्ये थांबिवणे भाग पडले. राहुल सिंगने आपल्या सर्व लढती आरएससी फर्स्ट राऊंडने जिंकत 48 – 50 किलो वाजनीगटात अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.