मुख्यमंत्र्यांशी चर्चेचे शिष्टमंडळाला दिले आश्वासन
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराच्या प्रस्तावित 30 कि.मी. रिंगरोडच्या गंभीर प्रश्नाबाबत, तसेच नागरी समस्यावर त्वरित तोडगा
काढण्याबाबत रिंगरोडमुळे बाधित होणार्या घरांच्या संदर्भात लवकरच मुंबई येथे मंत्रालयात बैठक बोलावली जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिंगरोड बाधितांच्या घरांच्या प्रश्नांबाबत खरी वस्तुस्थिती सांगितली जाईल. त्या बैठकीस घर बचाव संघर्ष समिती शिष्टमंडळाला बोलावून चर्चा घडविली जाईल, असे आश्वासन घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास नगरविकास व गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात समितीच्या शिष्टमंडळाने मंत्री रणजित पाटील यांची भेट घेतली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे माजी नियामक मंडळ सदस्य दिलीप ठाणेकर, प्रगती नाट्यसंपदा नागपूरचे अध्यक्ष किशोर डाऊ, रेखा भोळे, रजनी पाटील, शिवाजी इबितदार, नारायण चिघळीकर, विशाल बाविस्कर, चंदा निवडुंगे, वैशाली कदम, वैशाली भांगीरे, शोभा मोरे, सविता मोकाटे, माणिक सुरसे, रणजीत सिंग, दिलीप मोरे, हनुमंत वाबळे, उमाकांत सोनवणे, प्रदीप पवार, किरण पाटील, अमोल हेळवर, माऊली जगताप, संजय मोरे, शांताराम धुमाळ, सचिन पोखरकर, मोहिनुद्दीन शेख, बाळुराम शर्मा, राधेश्याम गुप्ता, रत्ना सुरसे, संजय जगताप उपस्थित होते.
तात्काळ निर्णय लागावा
समिती मुख्य समन्वयक विजय पाटील म्हणाले, राज्यमंत्री पाटील यांनी रिंगरोड बाधितांची बाजू ऐकून सकारात्मक निर्णय घेतला आहे. तसेच लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्तिथीत चेंज अलायमेंटबाबत निर्णय तात्काळ मार्गी लागावा, अशी मागणी केली.
प्रश्न कायमस्वरूपी सुटावा
समिती समन्वयक प्रदीप पवार म्हणाले, राज्यमंत्री रणजित पाटील यांनी घर बचाव संघर्ष समितीसमवेत शहराच्या गंभीर नागरी प्रश्नासंबंधी चर्चा केली असून, त्यामुळे रिंगरोड बाधितांना दिलासा मिळाला आहे. समिती गेल्या सहा महिन्यांपासून लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असून, सामान्यांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याकरिता लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे.
समन्वयक रेखा भोळे म्हणाल्या, रिंगरोड पुनःसर्वेक्षणकरिता तसेच पर्यायी मार्ग कसा निर्माण करता येईल, याकरिता राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने लवकर पावले उचलावीत, त्यामुळे हजारो बाधितांच्या घरांचा प्रश्न संपुष्टात येईल. समन्वयक नारायण चिघळीकर म्हणाले, गेल्या 35 वर्षांपासूनचा रिंगरोड बाधितांचा प्रश्न प्राधिकरण प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच लटकत राहिलेला आहे. याप्रसंगी शिवाजी इबितदार, वैशाली भांगीरे, सविता मोकाटे, रणजीत सिंग, दिलीप मोरे, मोहिनुद्दीन शेख, किरण पाटील, रत्ना सुरसे, शांताराम धुमाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.