‘रिंगरोड’वरील सूचनांची दखल घेणार – पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते

0

पिंपरी-चिंचवड : ‘नियोजन आणि विकासासाठीच पुणे महानगर प्राधिकरणाची निर्मिती झाली आहे. 7 हजार 257 चौरस किलोमीटर परिसरात पीएमआरडीए विकासाचे नियोजन करणार आहे. ‘एचसीएमटीआर’बाबत नागरिकांच्या सूचनांची नक्कीच दखल घेतली जाईल आणि त्यानुसारच ‘बीआरटी’चे नियोजन केले जाईल’, अशी ग्वाही पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती सोसायटीचे राज्य अध्यक्ष व घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी गित्ते यांची प्राधिकरण येथील मुख्य कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. गित्ते यांना समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले.

बाधित तसेच बेकायदा घरांचा प्रश्‍न

पीएमआरडीए 148 कि.मी. क्षेत्रात आठ मार्गांचे बीआरटी चे जाळे भविष्यात उभारणार आहे. ह्या आठ रस्त्यांमध्ये चार क्रमांकावर सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील वादग्रस्त असलेला एचसीएमटीआर रिंग रोड आहे. या रिंगरोडमुळे गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळे गुरव, कासारवाडी या उपनगरातील साडे तीन हजार पेक्षा जास्त घरे बाधित होत आहेत. या घरांसाठी तसेच 65 हजार अनधिकृत घरांच्या नियमितीकरण प्रश्‍नांसाठी पाटील यांनी ही भेट घेतली.

33 वर्षांपूर्वीचा रिंगरोड कालबाह्य

पाटील म्हणाले, शहरातील 1985 पासूनचा प्रस्तावित एचसीएमटीआर रिंग रस्ता हा कालबाह्य झालेला आहे. समितीचा विरोध विकासाला नाही. प्राधिकरण हद्दीतून तसेच पालिका हद्दीतून जाणार्‍या या सात कि.मी.च्या जागेत सद्यस्थितीत दाट रहिवासी घरे आहेत. त्यांना धक्का न लावता सदरचा 31.40 कि.मी.चा रस्ता बनविला जाऊ शकतो. महाराष्ट्र नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 37 नुसार गौण फेरफार करून तसेच विकास आराखड्याचे पुनःसर्वेक्षण करून सदरचा प्रकल्प मार्गी लागू शकतो.

डीपी टीमकडून सर्व्हे नाही

गेले 23 वर्ष शहराचा विकास आराखडा सुधारित झालेला नाही. त्यामुळे 8 लाख रहिवाशी नागरिकांच्या घरांचा यक्ष प्रश्‍न निर्माण झालेला आहे. शासनाने मार्च 2018 मध्ये नियुक्त केलेल्या 15 सदस्यीय डीपी टीमने अद्याप ह्या दाट राहिवासी परिसराचा सर्व्ह केलेला नाही. तोपर्यंत पालिकेने रस्ता बनवण्याची घाई करू नये. भूसंपादनाशिवाय नियमबाह्य निविदा काढण्याचा पराक्रम पालिकेने केल्यामुळे ‘घर बचाव’चे आंदोलन चिघळले आहे. आता या प्रस्तावित रस्त्यावर विनाअभ्यास बीआरटी चे नियोजन केल्यास हजारो नागरिकांच्या घरावर हातोडा पाडावा लागेल.

कोट
नियोजन आणि विकासासाठीच पुणे महानगर प्राधिकरणाची निर्मिती झाली आहे.सात हजार दोनशे सत्तावन्न चौरस किमी परिसरात पीएमआरडीए विकासाचे नियोजन करणार आहे.एचसीएमटीआर बाबत नागरिकांच्या सूचनांची नक्कीच दखल घेतली जाईल.व त्यानुसारच बीआरटी चे नियोजन केले जाईल.
पीएमआरडीए आणि पीसीएनडीटीए या दोन्ही स्वतंत्र स्वायत्त संस्था आहेत. या संस्थांचे विलीनीकरण आता अशक्यप्राय आहे. त्यामुळे एचसीएमटीआर रिंग रोड बाबत प्राधिकरण प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
– किरण गित्ते