बाधितांचा संपात; निविदा प्रक्रिया मागे घेण्याची मागणी
पिंपरी चिंचवड : रिंग रोडच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांना रस्त्याचे काम सुरु करण्याची घाई झाली आहे. या कामाची 28 कोटींची निविदा काढण्यात आल्याने संतापग्रस्त रिंग रोड बाधितांनी प्रशासकीय निविदा प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात बाधितांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची भेट घेतली. त्यावर, आमदार लक्ष्मण जगताप राजकीय फायद्यासाठी लोकांच्या घरावर नांगर फिरवायला निघाले असल्याची टिका साने यांनी केली आहे.
पालिका प्रशासनाला रस्त्याची घाई…
रिंग रोडमध्ये वाल्हेकरवाडी, थेरगाव, काळेवाडी-रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळ गुरव, कासारवाडी भागातील नागरिकांची घरे बाधित आहेत. रस्त्याची 80 टक्के जागा ताब्यात नसताना प्राधिकरणाने काळेवाडी, थेरगाव भागातील घरे पाडण्यास सुरूवात केली होती. या कारवाईच्या विरोधात घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी न्यायालयात धाव घेवून कामावर स्थगिती आणली. तरी, पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते काळेवाडी फाटा दरम्यान प्रस्तावित रिंग रोडचे काम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकार्यांनी 28 कोटींची निविदा प्रक्रिया राबविली आहे. न्यायालयाची स्थगिती असताना पालिका प्रशासनाला रस्ता करण्याची घाई झाल्याचा आरोपी बाधितांनी केला आहे.
रिंगरोड बाधितांची पालिकेत धाव…
प्रशासनाने निविदा थांबवावी यासाठी घर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि रहिवाशी सोमवारी आयुक्त श्रावण हार्डीकर यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी महापालिकेत आले होते. आयुक्त नसल्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते साने यांच्याकडे याबाबत दाद मागितली आहे. त्यावर सह शहर अभियंता राजन पाटील यांना केबिनमध्ये बोलावून साने यांनी रिंग रोडच्या कामाची माहिती विचारली. त्यावर पूर्ण जागा ताब्यात नसताना निविदा प्रक्रिया राबविण्याचे कारण काय, असा प्रश्न करत न्यायालयाची स्थगिती उठेपर्यंत हे काम सुरू करू नये, अशी मागणी रहिवाशांनी केली.