रिक्षाचालकांचा निषेध मोर्चा

0

भुसावळ । शासनाने तीनचाकी व चारचाकी रिक्षा, मिनीडोअर, कालीपिली आणि इतर वाहनांवर जास्तीचा कर लावल्यामुळे वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या निषेधार्थ राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे शनिवार 21 रोजी दुपारी 11 वाजता प्रांत कार्यालयावर चेतावनी मोर्चा काढण्यात येवून एकदिवसीय बंद पाळण्यात आला. प्रवासी वाहनधारकांवर जास्तीच्या करामुळे आर्थिक बोजे वाढले आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत असून शासनाने जादाचा कर रद्द करावा तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी मनमानी करीत असून जागेवर मेमो न देता वाहन बळजबरीने बस डेपो येथे लावतात आणि महिनाभर वाहन सोडत नाही. यातून पैशांची बेकायदेशिर मागणी केली जाते. याबद्दल संबंधित आरटीओ कर्मचार्‍यास बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निषेधार्थ प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येवून शहरातील काही रिक्षाचालक संघटनांनी प्रवासी वाहतूक एक दिवसासाठी बंद ठेवली. या आंदोेलनात भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड व जामनेर येथील वाहनधारक सहभागी झाले होते.

रिक्षाचालकांना विम्याचा लाभ मिळवून द्यावा
शासनाने दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी 2015 चे सर्व नियम लागू करावे. तसेच विमा संरक्षण हे तिसर्‍या व्यक्तींकडून असल्याने काही अपघात झाल्यास त्याचा वाहनधारकांना लाभ मिळत नाही. म्हणून विमा सरंक्षणाचा लाभ मिळावा, परमीट नियमित करावे तसेच त्याचप्रमाणे शाळकरी मुलांची वाहतुक करण्यासाठी खाजगी वाहनांना देखील परवानगी देण्यात यावी, सर्व वाहनधारकांना मुद्रा कर्ज योजनेचा लाभ मिळून द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

प्रवाशांची पायपीट
दरम्यान, या आंदोलनास शहरातील काही रिक्षाचालक संघटनांनी पाठिंबा दर्शवित एकदिवसीय बंद पाळला. त्यामुळे बाहेर गावाहून बस व रेल्वेने येणार्‍या प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होवू न शकल्याने प्रवाशांनी पायीच जाणे पसंत केले. यामुळे प्रवाशांची पायपीट होवून त्रास सहन करावा लागला.

यांचा होता सहभाग
या आंदोलनात प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, जिल्हा प्रमुख राजु डोंगरदिवे, विलास खरात, राजू साळवे, भगवानसिंग लांबा, शे. सलीम, तसलीम, असलम खान, महेश पवार, बापू पाटील, राजेश देवपुजे, जाकीर बागवान, फिरोज खान, मुजफ्फर अली, राजू नेहेते, समाधान पाटील, संजय बिजागरे, अनिल देशमुख, रवि मंदवाडे, भगवान तायडे, विनोद पाटील, पुनमचंद रामदयाल, बाळू वेरुळकर, कलीम बेग, शेख अब्दुल, नासीर जाफर, सुरेश माळी आदी सहभागी झाले होते.