रिक्षाचालकाच्या घरी चोरट्यांचा डल्ला

0

जळगाव । जळगाव शहरातील कासमवाडी अष्टभुजा देवी मंदीरा शेजारील रिक्षाचालकाच्या घरी रात्री चोरी झाल्याची घटना घडली. कुटूंबीय घरात झोपलेले असतांना खिडीकीतून हात घालून चोरट्यांनी आतुन लावलेली कडी उघडून घरात प्रवेश केला. कपाटातील दागिन्यांसह रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

कासमवाडी परिसरातील अष्टभुजादेवी मंदिराच्या शेजारी गोपाळ भास्कर कुंवर (वय-38) कुटूंबासोबत वास्तव्याला आहे. काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कुंवर कुटूंबीय जेवण अटोपुन झोपले. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने खडकीतून हात घालून दाराची कडी उघडली. घरात प्रवेश केल्यावर घरातील कपाटातील 400 ग्रॅम वजनाचे चांदिचे तीन जोड कडे, 5हजार रुपये रोख, 2 हजार रुपयांचा मोबाईल असा एकुण 27 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. सकाळी उठल्यावर दार उघडे दिसले, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. घरात चोरी झत्तल्याचे निदर्षनास आल्यावर गोपाळ कुंवर यांनी तक्रार दिल्यावरुन औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील करीत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.