पुणे । फुटबॉलच्या मैदानावर ते येताच विद्यार्थिनींनी एकच जल्लोष केला. आणि त्यांच्या प्रत्येक गोलला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली… एरवी विद्यार्थ्यांना ने-आण करणार्या रिक्षावाले काकांना अतिशय चांगल्या पद्धतीने फुटबॉल खेळताना पाहून विद्यार्थिनी हरखून गेल्या… आणि महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियनच्या घोषणा देत रिक्षावाले काकांचा हा अनोखा फुटबॉल सामना रंगला.
महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आणि रेणुका स्वरुप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलच्या वतीने आयोजित महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन या उपक्रमांतर्गत रिक्षावाले काकांचा फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, पर्यवेक्षिका विजयमाला घुमे, बी.डी. शिंदे आदी उपस्थित होते. एरवी टिव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून आवडीने क्रिकेटची कॉमेन्ट्री ऐकणारे रिक्षावाले काका आज चक्क मैदानात उतरून फुटबॉल खेळले. देशात क्रिकेट प्रमाणेच फुटबॉलदेखील सर्व घटकांत लोकप्रिय व्हावा, यासाठी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.मुख्याध्यापिका जयश्री शिंदे म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाच्या मिशन वन मिलियन या बहुउद्देशीय उपक्रमाला प्रोत्साहन देत शाळेमध्ये फुटबॉलचे सामने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी त्यासोबतच पालक आणि शिक्षकांचे फुटबॉल सामने देखील झाले. प्रत्येक शाळांमध्ये महत्त्वाचा भाग असलेले रिक्षावाले काकांचा फुटबॉल सामना देखील यावेळी भरविण्यात आला.