रिडींग एजन्सीवर कारवाई करा

0

भुसावळ। गावाच्या येथील पीसी 1, 2 व 3 क्षेत्रातील जळगाव रोड, यावल रोड, वरणगाव रोड, जामनेर रोड आदी भागातील तसेच भुसावळ तालुक्यासह वरणगाव, यावल, बोदवड, मुक्ताईनगर येथील 1 लाख 20 हजार पेक्षा जास्त ग्राहकांना 35 दिवसांपेक्षा जास्तचे तसेच 22 दिवसांपेक्षा कमी दिवसांचे बील देण्यात आले आहे. या सर्व भागात विज मीटर रीडिंग 45 दिवसानंतर तर काही भागात 25 दिवसाआधीच घेण्यात आलेले होते. रीडिंग उशिराने घेतले गेल्याने एप्रिल- मे- जून 2017 चे साधारण पेक्षा 40 टक्के जास्त बिल आले. याबाबत विज मीटर रीडिंग ऐजंसी विरोधात कारवाईच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे अधिक्षक अभियंता बनसोडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. मागील तीन वर्षापासून हा प्रकार सतत घडतो. याबाबत मुख्यमंत्र्याकडे ऑगस्ट 2015 मध्ये याविषयीची तक्रार प्रा.धिरज पाटील यांनी केली होती. रीडिंग ऐजंसीवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यलयातुन विज वितरण कंपनीच्या भुसावळ विभागाला देण्यात आलेले होते. परंतु राजकीय दबावापोटी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती.

तक्रार करुनही कारवाईकडे दुर्लक्ष
वारंवार तक्रार असून सुद्धा कारवाई का होत नाही असा लेखी खुलासा अतिरिक्त अभियंता यांना 29 जून रोजी विचारण्यात आला. कारवाई का केली नाही याची सखोल चौकशी करा असे निवेदन शिवसेना पदाधिकारी तसेच नागरिकांनी केले होते. विज वितरण अधिकारी एजंसीला पाठीशी का घालतात. विज मीटर रीडिंग एजंसीने योग्य रितीने रीडिंग घ्यावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे मीटर रीडिंग एजंसीला कळवले आहे असे लेखी निरर्थक उत्तर अतिरिक्त अभियंता यांनी दिलेले आहे.

एजन्सीला अभय कुणाचे?
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. कोणत्या राजकीय दबावा पोटी अधिकारी शांत आहेत? लाखो रुपयांचे नुकसान विज वितरण कंपनी का सहन करतेय? एजन्सीवर कोणाचा वरदहस्त आहे? अधिकारी व एजंसी दरम्यान आर्थिक तडजोड आहे का? नागरिकांपेक्षा मोठा असा कोणता नेता आहे ज्याला घाबरून अधिकारी कारवाई करत नाही याची चौकशी करणे महत्वाचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात तर तक्रारी वाढतात. मीटर रीडिंग उशिरा घेतले की 10 एप्रिल 2017 रोजीच्या कंपनीच्या कमर्शियल सर्कुलर नुसार प्रो राटा पध्दतीने ग्राहकांना नियमानुसार स्लॅब बेनिफिट द्यावे लागते.

यांची होती उपस्थिती
उत्पादन शुल्क वाढले तरी स्लॅब बेनिफिट दिल्याने महावितरणचे नुकसान होते. तसेच 22 दिवसांपेक्षा कमी दिवसांचे रीडिंग घेतल्यास ग्राहकांना स्लॅब बेनिफिट देवू शकत नाही त्यात ग्राहकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कारवाई न झाल्यास तालुक्यात विज वितरणच्या सर्व विभागीय कार्यालयासमोर आंदोलने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रसंगी तालुका प्रमुख समाधान महाजन, प्रा.धिरज पाटील, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, अजय पाटील, हेमंत चौधरी, निलेश महाजन, हर्षल पाटील, निलेश ठाकुर उपस्थित होते.