मुंबई । अभिनेता रितेश देशमुखच्या एका फोटोमुळे सध्या सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मेघडंबरीमध्ये बसून काढलेल्या एका फोटोमुळे सोशल रितेशवर टिकेची झोड उठविण्यात येत आहे. रितेश देशमुखनेदेखील यावर आपली भूमिका स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 6, 2018
अभिनेता रितेश देशमुख हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर चित्रपटाची निर्मिती करत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव, कादंबरीकार विश्वास पाटील व इतरांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाला भेट दिली. रितेश देशमुखने या भेटीची छायाचित्रे आणि त्याबाबतची माहिती गुरूवारी सोशल मीडियातून चाहत्यांना दिली. त्यातील एका छायाचित्रात रितेश देशमुख, रवी जाधव आणि विश्वास पाटील हे रायगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी बसल्याचे आढळले. या फोटोवरुन रितेश देशमुखवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. रितेशच्या समर्थनासाठी अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावरदेखील दोन्ही बाजूंनी वाद पेटल्यानंतर रितेशने तो फोटो सोशल मीडियावरुन हटवला. ’आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असे रितेश देशमुखने म्हटले. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागत असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न रितेश देशमुखने केला.