रिपब्लिकन पक्षात आता बाल आघाडी कार्यरत

0

जीत आठवले करणार नेतृत्त्व

मुंबई । युवक आघाडीसह अनेक आघाड्या यशस्वीपणे कार्यरत झाल्यानंतर आता आंबेडकरी चळवळीत पहिल्यांदाच रिपब्लिकन पक्षात बाल आघाडीची स्थापना करण्यात आली असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी रविवारी केली. रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जीत आठवले यांच्या नेतृत्खाली ही बाल रिपब्लिकन आघाडी काम करणार आहे. पक्षाच्या महिला आघाडीचे नेतृत्त्व आपल्या पत्नी सीमा यांच्याकडे सोपविल्यानंतर पक्षाध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपले चिरंजीव जीत आठवले यांच्याकडे पक्षाच्या बाल आघाडीचे नेतृत्त्व सोपविले आहे. या माध्यमातून आठवले परिवाराचे पक्षावर निर्णायक वर्चस्व निर्माण झाले आहे.

नवीन पिढीत राजकीय विचार
जीत आठवले यांनी नुकतीच मुंबईत चेंबूर येथे बाल आघाडीच्या तालुका आणि वॉर्डस्तरीय शाखांची स्थापना केली. आंबेडकरी चळवळीचे बाळकडू नव्या पिढीतील मुलांना बालपणापासून देण्यासाठी बाल रिपब्लिकन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक क्रांतीच्या, समतेच्या विचाराची शिकवण तसेच समाजसेवेचा सामाजिक दृष्टिकोन नव्या पिढीत रूजविण्यासाठी या आघाडीची स्थापना करण्यात आली असून या आघाडीचे नेतृत्त्व जीत आठवले करतील असे, रामदास आठवले यांनी सांगितले.

मीडियावरील हल्ल्याबाबत कायद्याची गरज
दरम्यान, पत्रकार आणि प्रसामाध्यमांवरचे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच राज्य सरकारने पत्रकारांना सहकार्य केले पाहिजे असेही आठवले यांनी म्हटले आहे.