रीक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम मोडल्यास कायद्याचा दंडुका

0

वरणगावचे सहाय्यक निरीक्षक जगदीश परदेशी यांचा बैठकीत ईशारा

भुसावळ- बेशिस्त वाहतुकीमुळे वरणगाव बसस्थानक चौकात वाहनांची कोंडी होऊन पादचार्‍यांना त्रास सहन करावा असल्याने नागरीकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी रीक्षा चालकांची बैठक घेऊन वाहतूक नियमांचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा सूचक इशारा दिला. वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच नागरीकांना येण्या-जाण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत, अशा पद्धत्तीने वाहने लावावीत, असे त्यांनी रीक्षा चालकांना बजावले.

प्रवासी वाहतूक करणारे रीक्षा चालक फैलावर
सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी पोलीस ठाण्यात मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, आयुध निर्माणी भागात प्रवाशांची वाहतूक करणार्‍या रीक्षा चालकांची गुरुवारी बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रवासी मिळवण्यासाठी चालक बेशिस्तपणे रीक्षा बसस्थानक चौकात उभ्या करतात. यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होते तसेच शाळा सुटल्यावर गर्दीतून विद्यार्थ्यांना मार्ग काढणे कठीण जाते. यामुळे रीक्षा चालकांविरूद्ध नागरीकांच्या तक्रारी वाढल्या असून रीक्षा चालकांनी स्वयंशिस्तीने रीक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या करणे आवश्यक असून बसस्थानक चौकात नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लघंण करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यास कारवाई केली जाईल, असा ईशारा त्यांनी दिला. यावेळी उपनिरीक्षक निलेश वाघ व रीक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दुचाकी चालकांवर होणार कारवाई
शहरात अल्पवयीन मुले व दुचाकीवर दोन पेक्षा जास्त माणसे बसलेली आढळून आल्यास दुचाकीधारकांवर कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे कर्कश आवाज करणारे हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करणार्‍यांवर देखील कार्यवाही होणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ यांनी सांगितले.

रीक्षा चालकांचा सकारात्मक प्रतिसाद
पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत रीक्षा चालकांनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बसस्थानक चौकात नियमांचे पालन केले जाईल तसेचे बेशिस्तीने रिक्षा चालवणार्‍या चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असे आश्वासन दिले.

रोड-रोमीओंवर होणार कारवाई
शाळा सुरू होतांना व सुटतांना विनाकारण शाळेच्या बाहेर टारगट मुले उभे असतात, अशा रोडरोमियोंवर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई केली जाईल.कारवाईसाठी साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे शालेय परीसरातील रोड-रोमिओंवर वचक निर्माण होण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

हात गाडीधारकांवरही कारवाईची मागणी
शहरात वाहतुकीच्या मुख्य मार्गावर व बसस्थानक चौकातील बोदवडकडे जाणार्‍या मार्गावर हातगाडीधारक विक्रेत्यांचाही वाहतूक कोंडीला अडसर ठरतो तसेच काही व्यावसायीकांच्या दुकानासमोर बेशिस्तपणे लावल्या जाणार्‍या वाहनांमुळेही वाहतुकीची कोंडी होते, अशा वाहनधारकांवर कारवाई करून व्यावसायीकांना योग्य ती समज देण्याचीही मागणी होत आहे.