खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी खंडपीठात दाद मागणार -राजू सूर्यवंशी यांनी स्पष्ट केली भूमिका
भुसावळ- कंडारी शिवारातील शिवारातील गट क्रमांक 159/1/2 मधील न्यायप्रविष्ट जागेवर बेकायदा शिरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी, प्रकाश निकम यांच्यासह 25 ते 30 जणांविरुद्ध 27 नोव्हेंबर 2018 रोजी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर खोट्या व बनावट कागदपत्रांद्वारे हा गुन्हा झाल्याने शहराची कायदा-सुव्यवस्था पाहता पोलिसांनी आंदो लकांना या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतरच अटक करण्याचे आश्वासन दिले होते. सोमवार, 21 या गुन्ह्यातील संशयीत आरोपी तथा आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, प्रकाश निकम, आकाश प्रकाश निकम व किशोर वानखेडे हे सोमवारी दुपारी स्वतःहून बाजारपेठ पोलिसांना शरण आले. संशयीतांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात न्या.वैद्य यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता चौघांचीही 15 हजारांच्या जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली.
बेकायदेशीरपणे गेट तोडून केले होते नुकसान
तक्रारदार सुनील अग्रवाल यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. कंडारी शिवारातील शेत गट क्रमांक 159/1/2 ही साडेपाच एकर जागेसंदर्भात न्यायालयात खटला न्यायप्रविष्ट असून जागा आहे तशीच ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असताना आरपीआय जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी, प्रकाश निकम हे जेसीबीसह 25-30 महिला व पुरुषांनी गेटचे कुलूप निलगिरीचे दोन व कडुनिंबाचे एक झाड तोडून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान केले होते शिवाय आपल्या अंगावर जेसीबी चढवून तुम्हाला ठार मारू, अशी धमकी सूर्यवंशी यांनी दिल्याचा आरोप अग्रवाल यांनी फिर्यादीत केला होता.
जिल्हाध्यक्षांसह चौघांना जामीन
रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह प्रकाश निकम, आकाश प्रकाश निकम, किशोर वानखेडे आदी स्वतःहून सोमवारी बाजारपेठ पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले. संशयीतांतर्फे अॅड.जगदीश कापडे, अॅड.मतीन अहमद व अॅड.स्वाती कापडे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून संशयीतांना 15 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
खोटा गुन्हा मात्र न्याय मिळाला -सूर्यवंशी
आमच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र जनतेच्या हितासाठी असे अनेक गुन्हे दाखल झालेतरी हटणार नाही, असे राजू सूर्यवंशी यांनी सांगत खोटा गुन्हा रद्द होण्यासाठी हायकोर्टात दाद मागितली जाईल, असेही सांगितले.