रुग्णवाहिकेचा अपघात; नर्स जखमी

0

देहू । ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने ट्रकच्या मागून भरधाव वेगात जात असलेली रुग्णवाहिका नवीन काम सुरू असलेल्या पुलाला धडकली. या अपघातामध्ये रुग्णवाहिकेतील नर्स जखमी झाली. सुदैवाने रुग्णवाहिकेत रुग्ण नसल्याने संभाव्य धोका टळला. हा अपघात देहूरोड येथे स्वामी विवेकानंद चौकातील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटर समोर रात्री 8.30 च्या सुमारास घडला.

प्रभा कोकाटे असे जखमी नर्सचे नाव आहे. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर चालक नंदकुमार भिताडे किरकोळ जखमी झाला आहे. दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाची रुग्णवाहिका देहूरोडकडून पुण्याच्या दिशेने येत होती. देहूरोड येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटर जवळ एका ट्रकने अचानक ब्रेक लावला. ट्रकच्या मागून रुग्णवाहिका भरधाव वेगात येत होती. ट्रकने अचानक ब्रेक लावल्यामुळे रुग्णवाहिकेच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व रुग्णवाहिका जवळच सुरू असलेल्या नवीन पुलाला धडकली.