रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे काम रखडले

0

इंदापूर । सुसज्ज ट्रामा केअर युनिटसह, 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा आराखडा तयार करून जुन्नर येथील सौरभ कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले होते. सव्वा तीन वर्षे लोटली तरी रुग्णांलयाचे काम पूर्ण करण्यास ठेकेदार कंपनीस सवड मिळाली नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा व सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी केली आहे.

सव्वा वर्षात म्हणजे 2015 अखेर काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असताना आज 2017 अखेर काम पूर्ण होऊ शकलेले नाही. यामुळे ठेकेदाराचा गलथानपणा व संबंधित सार्वजनिक बांधकाम इंदापूर शाखा अभियंता सांळुखे व उपअभियंता याचा हलगर्जीपणा व ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. रुग्णांच्या त्रासात वाढ झाल्याने संबंधित बांधकाम अधिकार्‍यांची तात्काळ बदली करण्याची मागणी जोर धरत आहे.

शस्त्रक्रिया विभाग तळमजल्यावर असल्याने गैरसोय
रुग्णालयातील दुसर्‍या मजल्याचे काम पूर्ण झाल्याने दवाखान्यातील सर्व रुग्ण वर्षभरापासून दुसर्‍या मजल्यावर हलवण्यात आले आहेत. प्रसूती विभाग दुसर्‍या मजल्यावर व प्रसूतीची खोली व शस्त्रक्रिया विभाग तळमजल्यावर असल्याने येथील रुग्ण दुसर्‍या मजल्यावर नेताना कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जनरल वॉर्ड हा दुसर्‍या मजल्यावर असल्याने वयोवृद्ध, प्रौढ रुग्णांच्या अडचणीत भरच पडत आहे. रुग्णालयातील यंत्रसामग्री हलवावी लागत असल्याने तेथे काम करणारे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कंपनीचा ठेका तात्काळ रद्द करून दुसर्‍या कंपनीला काम देण्याची मागणी होत आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता व अधिक्षक अभियंता यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज असून तालुक्याचे आजी-माजी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ठेकेदार व त्याला संगनमताने पाठीशी घालणारे उपअभियंता व शाखा अभियंता यांच्यावर तातडीने कारवाईचे आदेश देऊन काम पूर्ण न केल्याबद्दल त्यांच्यावर दडांत्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.