रूग्णवाहिका न मिळाल्याने कोरोना बाधिताचा मृत्यू

0

जामनेर (प्रल्हाद सोनवणे)-जामनेर शहरातील जामनेरपुरा येथील 65 वर्षीय वृद्ध रुग्णाचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या रुग्णाला आज सकाळी 11 वाजता उपजिल्हा रुग्णालय येथे खाजगी वाहनांनाने उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जळगाव जिल्हा कोवीड रुग्णालयात दाखल करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका बोलविण्यात आली. मात्र 108 नंबर वर फोन करुन सुध्दा साडेतीन तासांनंतरही रुग्णवाहीका आली नाही. नाईलाजाने रुग्णांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णवाहीका बोलविली. तरीही कोरोनाबाधित रुग्णाला जळगाव कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या रुग्णाचा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जामनेर उपजिल्हा रुग्णालयात खाजगी रुग्णवाहिकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त झालेल्या नातेवाईकांनी केला.

जामनेर येथे स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कोरोना बाधिताचा उपचाराअभावी मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या रुग्णाचा बळी गेला असुन रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने जामनेरपुरा भागातील नातेवाईकांचा जमाव जमा झाला होता. रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करुन रुग्णालयातच कोरोनाबाधित मृत रुग्णाचा मृतदेह जाळुन टाकु अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड व दुर्लक्ष प्रशासन करीत असून गिरिजा कॉलनीतील रुग्णांच्या बाबतीत असाच प्रकार घडला. तासन्तास रूग्णवाहिकेची वाट पाहावी लागत आहे. वारंवार संपर्क साधुनही जबाबदारी झटकण्या पलीकडे प्रशासन काहीच करीत नाही या मुळे कोरोना बधितांची संख्या वाढण्यास प्रशासनही जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.

भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी प्रशासकीय अनास्थामुळे अनेक रुग्णांचे बळी जात असुन त्यामुळेच जिल्ह्यात मृत्यूदर वाढत असुन संबधित अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करुन मनुष्यवधाचा गुन्हा करावा अशी मागणी करुन संताप व्यक्त केला.

आमदार महाजनांनी विचारला जाब
यावेळी नगरसेवक बाबुराव हिवराळे, श्रीराम महाजन,सुभाष पवार,किशोर बोरसे यांच्यासह नातेवाईक संतप्त झाल्याने काही वेळात आ गिरिष महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, ता आरोग्य अधिकारी राजेश सोनवणे, विनय सोनवणे उपस्थीत होते.

प्रशासन गंभीर नाही – आमदार गिरीश महाजन
जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून 4 महिन्यांपासून प्रशासनाला सूचना केल्या आहेत की प्रत्येक कोविड सेंटरला रुग्णवाहिका देण्यासाठी मागणी केली होती. परंतु भुसावळची जामनेरला, जामनेरची पाचोर्‍याला या पलीकडे प्रशासनाने काहीच केले नाही. खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्यासाठी सूचना केल्या असून काहीही कार्यवाही होत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळेच रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.