नवी दिल्ली – संशयित करोना रुग्णांच्या तपासणीसाठी चीनमधून आलेल्या ‘रॅपिड टेस्टिंग किट’च्या चाचण्यांच्या निष्कर्षांमध्ये तफावत येत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस त्यांचा वापर करू नये, असे निर्देश इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सर्व राज्यांना दिले आहेत.
आयसीएमआरच्या डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. पुढच्या दोन दिवसांत आठ संस्थांना फिल्डमध्ये पाठवून या किटची चाचणी करण्यात येईल आणि परीक्षणात काही गडबड आढळल्यास चीनच्या संबंधित कंपन्यांना त्या किटची बॅच परत पाठवून बदलून मागितली जाईल. त्यामुळे या किटचा पुढचे दोन दिवस राज्यांनी वापर करू नये. परीक्षणानंतरच त्यांच्या वापराविषयी स्पष्ट सल्ला देता येईल, असे ते म्हणाले.
करोना हा आजार केवळ साडेतीन महिन्यांपूर्वी जगाला अवगत झाला. पण, गेल्या साडेतीन महिन्यांत विज्ञानाची जी प्रगती झाली ती आजवर झालेली नाही. करोनावरील लस आणि औषधावर काम करणार्या वैज्ञानिकांच्या ७०पैकी पाच गटांचे संशोधन मानवी चाचण्यांच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. इतर कुठल्याही आजाराच्या बाबतीत आजवर एवढ्या वेगाने संशोधन झाले नव्हते, असे मत डॉ. गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.