महाराष्ट्रातील फुले विचार समर्थकांचा पाठिंबा
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींच्या शिक्षणासाठीची ही ज्ञानज्योत आज देशाला प्रगती पथावर नेत आहे. दरवर्षी प्रमाणे 1 जानेवारी हा दिवस यंदा देखील फुले दांपत्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त माळी महासंघातर्फे आज आयोजित भव्य रॅलीव्दारे फुले दांपत्याला अभिवादन करण्यात आले. या रॅलीमध्ये महाराष्ट्रातून माळी समाजातील बंधू-भगिनी, समविचारी व्यक्ती, कार्यकर्ते आणि फुले विचार प्रचारक – प्रसारक सहभागी झाले होते.
यावेळी अविनाश ठाकरे, गोविंद डाके, दीपक जगताप, जगन्नाथ लडकत, राजाभाऊ रायकर, काळुराम गायकवाड, अश्विन गिरमे, अतुल क्षीरसागर, चंद्रशेखर दरवडे, प्रवीण बनसोडे, अनिल साळुंखे, हनुमंत माळी, रेखाताई रासकर, राखी रासकर, शारदा लडकत, संतोष लोंढे उपस्थित होते.
सजवलेले रथ, लेझिम, टाळ-मृदुंग आणि महिला ढोल पथक यांसह फुले विचारांचे फलक घेतलेले नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. भिडे वाडा येथून या रॅलीचा प्रारंभ होऊन ती पुढे दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, फडगेट पोलीस चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलीस चौकी चौक मार्गे महाराणा प्रताप रस्त्याकडून येऊन फुले वाडा येथे या रॅलीचा समारोप झाला. यावेळी अविनाश ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.