खिर्डी- जवळच असलेल्या रेंभोटे गावातील लिलाधर रवींद्र विणकर यांच्या घराला तसेच योगेश शिवदास पाटील यांच्या गोडाऊनला सोमवारी रात्री 12.30 ते दिड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लीलाधर विणकर यांच्या घरातील दरवाजे, खिडक्या, पाण्याच्या टाक्या, खाटी, टीव्ही तसेच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले तसेच योगेश पाटील यांच्या गोडावूनमधील गुरांचा चारा, ठिबक संच, दोन स्प्रिंकलर, पाईप तसेच मजूर कामगारांचे घरातील खिडक्या, कपडे, गहू, टीव्ही, मिक्सर,व्यवसायातील साहित्य आणि घरातील सामान जळून खाक झाले. या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली असलीतरी त्यात लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. मात्र नेमकी कशामुळे लागली ? हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तसेच रावेर येथून अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले.
तहसीलदार व मंडळाधिकारी यांची घटनास्थळी भेट
रावेर तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांनी आगीची माहिती कळताच घटनास्थळी भेट देत पाहणी केली. संबंधीत अधिकार्यांना तत्काळ पंचनाम्याचे आदेश देण्यात आले.
पंचनाम्यात लाखोंचे नुकसान
आगीचे वृत्त महसूल विभागाला कळताच तांदलवाडी तलाठी रेखा जोरवार यांनी पंचनामा केला. त्यात लिलाधर रवींद्र विणकर यांचा अंदाजे 87 हजार 100 रुपयांचे तर योगेश शिवदास पाटील यांचा अंदाजे तीन लाख 43 हजार 900 रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला.