‘रेड स्वस्तिक’च्या माध्यमातून तरुणावर मोफत शस्त्रक्रिया

0

एरंडोल । पित्ताशयात असलेल्या खड्यांमुळे मानसीकरित्या खचलेल्या तरुणावर रेड स्वस्तिक सोसायटीचे प्रदेश जनसंपर्क संचालक रोशन मराठे व त्यांच्या सहकार्‍यांनी मुंबई येथील प्रसिद्ध रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करून पिडीतग्रस्त तरुणास जीवदान दिले. रेड स्वस्तिक सोसायटीचे कल्याण येथील जनसंपर्क अधिकारी जितेंद्र पाटील यांचे त्यांना सहकार्य लाभले. योगेश पाटील यांनी शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केल्याबद्दल रेड स्वस्तिकच्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले.

उपचार सुरू असतांना झाली डायरीयाची लागण
धनंजय गिफ्टचे संचालक योगेश पाटील या युवकास अनेक दिवसांपासून पोट दुखीचा त्रास होत असल्यामुळे तो मानसीकरित्या पूर्णपणे खचला होता. त्यास जळगाव येथे खाजगी दवाखान्यात तपासणीसाठी नेले असता डॉक्टरांनी त्याच्या पित्ताशयात खडे असल्याचे निदान केले. यासाठी शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले. मात्र योगेश पाटील यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांचेसमोर आजारावरील उपचाराबाबत प्रश्न निर्माण झाला होता. योगेश पाटील यांनी राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या समवेत मुंबई येथे जाऊन रुग्णालयात जाऊन उपचार सुरु केले. मात्र त्यांना फरक पडला नाही. दवाखान्यात उपचार सुरु असतांना त्यांना डायरीयाची लागण झाल्यामुळे ते मानसिक दृष्ट्या पूर्ण खचून गेले होते. रेड स्वस्तिकचे राज्य जनसंपर्क संचालक रोशन मराठे यांना योगेश पाटील यांच्या आजाराबाबत माहिती समजली. रोशन मराठे यांनी योगेश पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांशी आजरांबाबत चर्चा करून आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या मोफत करून घेतल्या. तसेच दानशूर व्यक्तींशी संपर्क साधुन शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च जमा करून योगेश पाटील यांची पित्ताशयातील खड्याची शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी सहकार्य केले.