जळगाव। शहरातील रेल्वे स्टेशनवरील वाढत्या प्रवाशी व वाहनांच्या गर्दीमुळे या रस्त्यावरून मार्ग काढणे कठीण जात असते. याला पर्याय काढण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या बाजुने असलेल्या संरक्षण भिंत पाडून नवीन 12 मीटर नवीन रस्ता शनिवारी तयार करण्यात आला. या पर्यायी मार्गासाठी खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेशे भोळे , आमदार चंदुभाई पटेल यांनी पाठपुरावा केला होता. आमदार चंदुभाई पटेल यांनी 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मनपा आयुक्तांना पत्र देवून पर्यायी रस्त्यांची मागणी केली होती. या मागणीवर सकारात्मक तोडगा निघण्याचे दृष्टीने 18 मे रोजी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुभाई पटेल, जिल्हाधिकारी निंबाळकर, तत्कालीन मनपा आयुक्त जीवन सोनवणे, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्यासह रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्यांनी त्या स्थळाची प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली होती. यावेळी काही तांत्रिक त्रुटी आढळल्या होत्या मात्र, रेल्वे प्रशासनाने नवीन रस्ता तयार झाल्यानंतर वाहन पार्कींगची समस्या निर्माण होईल तसेच पार्कींग सुविधेतून मिळणारे उत्पन्न बंद होईल अशी शंका व्यक्त करीत नवीन रस्त्यासाठी जागा देण्यास विरोध दर्शविला होता.
जेसीबीची केली विधीवत पूजा
प्रत्यक्ष पाहणी केली असता रेल्वे स्टेशनच्या बाजुने असलेल्या संरक्षण भिंत तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी तात्काळ महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांना पाचारण करण्यात आले. अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान हे पथक जेसीबीसह हजर झालेत. जेसीबीचे खासदार, आमदार, महापौर यांच्याहस्ते विधीवत पूजा करून भिंत तोडण्यास सुरूवात करण्यात आली. रेल्वे स्टेशनच्या बाजुने असलेल्या संरक्षण भिंतीजवळील पार्किंगच्या जागेपासून तर बीग बाझार परिसराजवळुन गोविंद रिक्षास्टॉप पर्यत हा नवीन रस्ता असणार आहे. संरक्षण भिंत 12 मीटर तोडण्यात आली असून खान्देश मिलजवळील गोविंद रिक्षास्टॉप जवळ 24 मिटर जागा असणार आहे. नवीन रस्ता तयार झाल्याने नेहरु पुतळ्या जवळील रस्ता फक्त येण्यासाठी तर नवीन रस्ता जाण्यासाठी असणार आहे. खान्देश सेंट्रल मॉलच्या खुल्या जागेत वाहन पार्किग करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासन व महानगरपालिका हे खान्देश सेंट्रल मॉलच्या प्रशासनाशी चर्चा करुन परवानगी घेणार आहेत. त्यानंतर सदर रस्ता जाण्या-येण्यासाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. ही भिंत काढल्यामुळे रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
जिल्हाधिकारी दालनात बैठक; आमदारव्दयींची उपस्थिती
यासंदर्भांत पुन्हा आज खासदार ए. टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुभाई पटेल, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, उप जिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, सहा. नगररचनाकार भास्कर भोळे, जळगाव शहर अभियंता सुनिल एस. भोळे, पोलिस उपअधिक्षक सचिन सांगळे रेल्वे प्रशासनातर्फे डीआरएम आर. के. गुप्ता, चिफ डीव्हिजनल इंजिनिअर ए.के. सिंग, डीसीएम व्ही. पी. दहाड, जीवन चौधरी आदि सह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लिफ्टबाबत नाराजी : जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता वन वे करण्याची मागणी केली. रेल्वे स्टेशनच्या पार्कींगची भिंत तोडल्यास समस्या दूर होवू शकते असा उपायही सूचविला. तसेच जळगाव रेल्वे स्टेशनवरील लिफ्टचे कामाबाबत चार वर्षांपासून पाठपुरावा करून देखील संथ गतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी खासदार ए. टी. पाटील यांनी 29 जुलै रोजी लिफ्टचे धुळे येथून रेल्वेमंत्री ऑनलाईन उद्घाटन करतील अशी माहिती दिली. खासदार पाटील यांनी देखील रेल्वे स्टेशनवरील गर्दींचा मुद्दा पकडत त्यांना देखील गर्दीचा त्रास सहन करावा लागल्याने पर्यायी नवीन रस्ता करण्याचे सांगितले. खासदार पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे सूचविले. सर्व लोकप्रतिनिधी व अधिकार्यांचा ताफा थेट बीग बाजार परिसरातील रेल्वे स्टेशनच्या बाजुने असलेल्या संरक्षण भिंतीजवळ पोहचला.