रेल्वेच्या निरीक्षकावर लगेजमाफीयांचा हल्ला

0

कल्याण। कल्याण रेल्वे स्थानकातील मुख्य वाणिज्य निरीक्षक संदीप तिवारी यांच्यावर विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात लगेज माफियांनी हल्ला केला. रेल्वेमध्ये बेकायदेशीरपणे सामान चढवण्याला विरोध केल्याने हा हल्ला झाला आहे. रेल्वेतून जाणार्‍या लगेजबाबत तिवारी यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या.

विठ्ठलवाडी स्थानकात सामानाची तपासणी करत तिवारी यांनी बेकायदेशीर लगेजविरोधात कारवाई सुरु केली. त्याचा राग आल्याने तिथे मुसा नामक व्यक्तीने बिअरच्या बाटलीच्या काचेने आपल्यावर वार केल्याचा दावाही तिवारी यांनी केला आहे. एका टीसीसमोर हा हल्ला करण्यात आला. तिवारी यांना कल्याण रेल्वेच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी ठाण्याचे संजय गुप्ता यांच्यावर कोपर रेल्वे स्थानकात असाच हल्ला झाला होता.