भुसावळ। शहरातील रेल्वे उत्तर वॉर्डात कर्मचार्यांच्या निवासस्थानांलगत अतिक्रमण करुन झोपडे उभारण्यात आले आहे. या झोपड्या हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे वारंवार प्रयत्न करण्यात आले. मात्र येथील रहिवाशांचा तीव्र विरोध लक्षात घेता रेल्वे प्रशासनास येथील झोपडपट्टी हटविणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे आता केवळ लोकोशेड परिसरातील आगवाली चाळीतील रेल्वेच्या ब्रिटीशकालीन जीर्ण झालेल्या सर्व क्वॉटर्स पाडण्यात येणार असून त्या खाली करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे प्रत्येक घरावर नोटीस लावण्यात आली आहे.
यामुळे साहजिकच क्वॉटर्सच्या भिंतीला लागून उभारलेले झोपडेदेखील पडणार आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मात्र रेल्वे प्रशासनाने अगोदर पर्यायी व्यवस्था करावी मगच या क्वॉटर्स तोडण्यात येण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
अधिकृत स्वाक्षरीच नाही
रेल्वे प्रशासनातर्फे या क्वॉर्टर्सवर नोटीस लावण्यात आली असून रहिवाशांनी अनाधिकृतपणे या निवासस्थानांवर ताबा घेतल्यामुळे त्या येत्या दहा दिवसात खाली करण्याच्या सुचना केल्या आहेत. मात्र या नोटीसवर रेल्वेच्या संबंधित विभागाच्या अधिकार्याची कुठलीही स्वाक्षरी किंवा शिक्का दिसून येत नाही. मात्र दोन दिवसांपूर्वी रेल्वेच्या अधिकार्यांनी या भागाची पाहणी करुन हे निवासस्थाने जीर्ण झाली असल्यामुळे हि पाडण्यात येणार असल्याचा सुचना दिल्याचे रहिवाशांनी सांगितले. या क्वॉर्टरवर काही बाहेरील नागरिकांनी देखील अनाधिकृतपणे ताबा घेतला असल्याचे समजते.
पिढ्यांपासून नागरिकांचा रहिवास
शहरातील आगवाली चाळ परिसरात ब्रिटीशकालीन क्वॉटर्स आहेत. रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही काही कर्मचार्यांनी या घरांचा ताबा न सोडता येथेच आपले बस्थान बांधले. तर रिक्त घरांमध्ये नविन कर्मचार्यांना परवानगी न दिल्यामुळे बाहेरील व्यक्तींनीच या घरांचा अनाधिकृतपणे ताबा घेतलेला आहे. या रहिवाशांच्या सहा ते सात पिढ्या या घरांमध्ये गेल्या असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
छत हिरावण्याची भिती
रेल्वे उत्तर वॉर्ड भागात असलेल्या ब्रिटीशकालीन क्वॉर्टर्समध्ये रहिवास करणारे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या नातलगांनी याचा ताबा सोडला नसल्यामुळे ते गेल्या सहा ते सात पिढ्यांपासून याच घरांमध्ये रहिवास करीत आहे. तर काहींनी या क्वार्टर्सच्या भिंतील लागून आपले झोपडे उभारले आहे. आता रेल्वे प्रशासनातर्फे या जीर्ण झालेल्या क्वॉर्टर्स पाडण्यात येणार असल्यामुळे साहजिकच झोपडया देखील पडतील. त्यामुळे ऐन पावसाळ्यात डोक्यावरील छत हिरावले जाण्याची भिती या नागरिकांना पडली आहे. त्यामुळे याबाबत रहिवाशांकडून विरोध होत आहे.
रहिवाशांना पर्यायी व्यवस्था करुन देण्यासाठी खासदारांच्या माध्यमातून पाठपुरावा
रेल्वे प्रशासनाने ऐन पावसाळ्यात घर खाली करण्याचे नोटीस बजावल्याने रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. भर पावसात या रहिवाशांनी आपल्या निवार्यासाठी कुठे जावे याचंसुध्दा रेल्वे प्र्रशासनाला भान नसल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने घरकुल योजनेचा लाभ काढला असूनही फक्त सात हजार लाभार्थ्यांना घरकुल मिळणार. कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे उत्तर रेल्वे भागातील रहिवाशांनी कुठे आसरा घ्यावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. पश्चिम रल्वे परिसरामध्ये रेल्वे प्रशासनाने हटविलेल्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था करुन दिली आहे तसेच मध्य रेल्वेकडे या बाबीची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे संबंधित खासदार रक्षा खडसे तसेच अधिकार्यांना भेटून पर्यायी व्यवस्था करुन देण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांनी सांगितले.
रेल्वे प्रशासनाने कोणतीही नोटीस बजावण्याच्या अगोदर जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करुन गरजू व अल्पसंख्यांक समाजासाठी कुठेतरी पर्यायी व्यवस्था करायला हवी होती त्यानंंतरच कोणतेही आदेशाची कारवाई करायला हवी. कोणत्याच बाबीची चर्चा न करता नोटीसा बजावून गरजुंना बेघर करण्याचा कट आहे.
उल्हास पगारे, विरोधी गटनेता