भुसावळ बसस्थानकाजवळील प्रकार ; व्यावसायीकाचे नुकसान
भुसावळ : बसस्थानकाला लागूनच रेल्वे प्रशासनाकडून संरक्षक भिंत उभारण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. रविवारी या भिंत उभारणीसाठी खोदलेला पाया खचल्याने त्याला लागून असलेल्या बेकरी उलटल्याने व्यावसायीकाचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाले तर दोन बालके किरकोळ जखमी झाली. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बसस्थानका लागूनच रेल्वे संरक्षक भिंत उभारत आहे तर या भिंतीला लागूनच शेख बशीर अब्दुल रहेमान यांची एस.टी.बेकरी स्टॉल नावाची बेकरी आहे. रविवारी बेकरीची टपरी ज्या भिंतीला सपोर्टींग होती तिचा पाया अचानक खचल्याने उलटली. यात फ्रीज, काचेचे काऊंटर, शोकेस तसेच लोखंडी शटर, फॅन आदी मिळून सुमारे 50 हजारांचे नुकसान झाल्याचे शेख बशीर म्हणाले. या अपघातात शेख उमेर शेख हबीब व शेख मुसेफ या दोन बालकांना किरकोळ जखमा झाल्या.