भुसावळ। मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातील मुख्य तिकीट निरीक्षकास स्वयंपाकी व त्यांच्या सहकार्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवार 26 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. रेल्वे तिकीट तपासणीसांच्या विश्रामगृहात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई सीएसटी येथील मुख्य तिकीट निरीक्षक डी.पी. सिंह हे बुधवार 26 रोजी 12322 डाऊन एक्सप्रेसने सेवा बजावून सकाळी भुसावळात पोहचल्यानंतर विविध विभागातून भुसावळ येथे येणार्या तिकीट तपासणीसांसाठी उत्तर दिशेला स्थानकालगत असलेल्या विश्रामगृहात जाऊन थांबलेले होते. यादरम्यान त्यांना मारहाण झाली.
पुर्व वैमनस्यातून मद्य प्राशनानंतर मारहाण
दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास डी.पी. सिंह हे स्वयंपाक खोलीत जेवण करीत असतानांना विश्रामगृहाचे कंत्राटी व्यवस्थापक राजू अहिरे, स्वयंपाकी मार्टीन, पवन झाल्टे व अन्य चार पाच जणांनी पुर्ववैमनस्यातून मद्य प्राशसनानंतर ओढून नेत लाकडी दांडा, हात व पायांनी मारहाण केली. विविध विभागातील रेल्वे तिकीट तपासणीसांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले. रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा विभाग दुर्लक्ष करीत असल्याने मद्द प्राशन, जुगार खेळणारी बाहेरील मंडळी येथे नेहमीच येते. व्यवस्थापक राजू अहिरे यांनी घटनास्थळी थांबून आपला या घटनेशी संबंध नसल्याचे व वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केल्याचे ठामपणे सांगितले. मार्टीन व पवन मात्र पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट तपासणीस) अजय कुमार, एनआरएमयुचे विभागीय सचिव इब्राहिम खान, आयआरटीसीएसओ संघटनेचे विभागीय अध्यक्ष एस.के. दूबे, विभागीय मुख्य तिकीट निरीक्षक अहलूवालिया, रईस शेख, अफसर खान यांनी धाव घेत त्यांना जाब विचारला. एएसआय डी.आर. यादव, लवकुश शर्मा आदी घटनास्थळी ठाण मांडून होते. उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद नव्हती. दरम्यान या मारहाणीमुळे तिकीट निरीक्षकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.