नवी दिल्ली – रेल्वे प्रवाशांचा अनुभव अधिक दर्जेदार बनवण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल व राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते सोमवारी दोन अॅप लॉन्च करण्यात आले. ‘रेल मदत’ व ‘मेन्यू ऑन रेल’ या दोन अॅप्सद्वारे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी व खाद्यविषयक माहितीसाठी मदत होणार आहे. मेन्यू ऑन रेलद्वारे प्रवासादरम्यान उपलब्ध असणाऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तूंविषयी प्रवाशांना सर्व माहिती उपलब्ध होईल. रेल मदत अॅपमुळे प्रवासी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करू शकतात. या तक्रारीचे रेल्वेद्वारे त्वरित निवारण करण्यात येईल.
मेन्यू ऑन रेल अॅपमध्ये आपण प्रवास करत असलेल्या ट्रेनचे नाव टाकल्यानंतर ट्रेनमध्ये कोणते खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत, याची माहिती त्यांच्या किमतीसह उपलब्ध होईल.
प्रवाशांसाठी महत्वाचे
अॅप उद्घाटन समारंभाच्या वेळी गोयल यांनी सांगितले, “महात्मा गांधींची तत्वे समोर ठेवून गरिबांसाठी संपर्क वाढवणे, ही या वर्षीच्या विकासाची संकल्पना आहे. आम्ही योग्य हेतूने विकासाच्या दिशेने काम करतोय. त्यामुळे आम्हाला लक्षणीय परिणाम बघायला मिळाले आहेत. सुरक्षेत वाढ करणे, रेल्वे अपघात टाळणे, सर्व कोचमध्ये सीसीटीव्ही बसवणे व आपली उरलेली कामे पूर्ण करणे यावर आम्ही लक्ष केंद्रित करतोय.”