चाळीसगाव (सूर्यकांत कदम)। बीड जिल्ह्यातून रेल्वेने अहिरवाडी येथे भुसावळमार्गे येताना 13 मे रोजी कजगाव पुढे दीड किमी अंतरावर धावत्या रेल्वेतून डाऊन लाईनजवळ नाल्यामध्ये रात्री 2 वाजेच्या सुमारास पडलेला एक प्रवासी तब्बल 12 तास पडून होता. नंतर एका ग्रामस्थाने दिलेल्या माहितीवरुन चाबीदार किसन पाटील यांनी शोध घेतल्यावर दुसर्या दिवशी दुपारी त्याला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रवाशाची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी दिली.
दरवाजातून पडल्याने गंभीर जखमी
सुखदेव गोमटे हे वीटभट्टी कामगार उदरनिर्वाहासाठी परिवारासह बीड जिल्ह्यातील डावनगाव येथे गेले होते सुटी काढून ते अहिरवाडीला येण्यासाठी 12 मेरोजी बीड रेल्वेस्थानकावरुन भुसावळला येण्यासाठी रात्री 10 वाजेच्या सुमारास रेल्वेत बसले. मात्र 13 मे रोजी रात्री ते दरवाजात बसले असतांना गाडीच्या झटक्याने कजगाव रेल्वे स्थानकाच्यापुढे खांबा क्र 348/0/1/3 जवळ डाऊन लाईनच्या बाजुला खड्ड्यात पडले. ते खड्यात पडलेले कोणालाही दिसले नाही मदतीसाठी त्यांचा आवाजही निघत नव्हता. जबर मार लागल्याने ते तब्बल 12 तास जागेवर विव्हळत पडले होते.
चाबीदार पाटलांची तत्परता
एका शेतकर्याने ही माहिती स्टेशन मास्तर यांना दिल्यावर त्यांनी ड्युटीवरचे चाबीदार किसनदादा पाटील यांना या प्रवाशाचा शोध घेण्याची सूचना दिली 2 िंकलोमीटर अंतरावर ते दिसल्यानंतर पाटील यांनी नगरदेवळा येथे फोन केल्यानंतर रुग्णवाहिका आली पाटील यांनी गोमटे यांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी आणल्यानंतर डॉ. बी. पी. बाविस्कर यांनी उपचार केले. सोमवारी दुपारी ते बोलतदेखील होते.