भुसावळ। मध्य रेल्वेत भुसावळ विभागाने चांगली कामगिरी केली असून यात कर्मचार्यांचा मोलाचा वाटा आहे. कुठलेही कार्य हे टिमवर्क असते कर्मचार्यांच्याच जोरावर आपण हवे ते उद्दीष्ठ गाठू शकतो. त्यामुळे कर्मचारीहित लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती भुसावळ विभागाचे नवनियुक्त डिआरएम रामकरण यादव यांनी दिली. यादव यांनी सोमवार 17 रोजी आपली जबाबदारी स्विकारली.
रेल्वे स्थानकावर अधिकार्यांनी केले स्वागत
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ प्रबंधक सुधीरकुमार गुप्ता यांची जबलपूर येथे बदली झाल्यामुळे त्यामुळे त्यांच्या जागेवर दिल्ली मेट्रोमधील रामकरण यादव यांनी नियुक्ती करण्यात आली होती. यादव यांचे दिल्ली येथून गोवा एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर सकाळी आगमन झाले. यावेळी स्थानकावर डिआरएम गुप्ता, एडीआरएम अरुण धार्मिक, वरिष्ठ कार्यअधिक्षक तुषाबा शिंदे यांसह इतर अधिकारी वर्ग स्वागतासाठी उपस्थित होते.
विभागनिहाय नियोजन करणार
डिआरएम यादव यांनी आपला पदभार स्विकारल्यानंतर भुसावळातील विविध विभागांची पाहणी करण्यात येऊन तेथील कामकाजाची पध्दती समजून घेतली जाईल, त्यानंतर विभागनिहाय नियोजन करण्यात येऊन कामकाजासंदर्भात कर्मचार्यांना सुचना केल्या जातील असेही डिआरएम यादव यांनी सांगितले.
युनियन नेत्यांशी चर्चा
नवनियुक्ती डिआरएम यादव यांनी प्रबंधक कार्यालयात दाखल झाल्यानंतर डिआरएम गुप्ता यांनी त्यांना पदभार सोपविला. यानंतर यादव यांनी कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी रेल्वेच्या विकासासाठी कर्मचार्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. तसेच कर्मचार्यांना कुठल्याही समस्या भेडसावल्यास कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांनी लागलीच आपल्या समस्या मांडव्या त्या सोडविल्या जातील, असेही डिआरएम यादव यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.