मुंबई :- बोरिवलीत रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना आज (सोमवारी) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. चौघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ असून इतर दोघे त्यांचे चुलत भाऊ आहेत.
रेल्वेरूळ ओलांडतांना एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
हे देखील वाचा
बोरिवली रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, बोरिवली- कांदिवली दरम्यान पोईसरजवळ लोकल ट्रेनचा वेग मंदावला होता. याचदरम्यान ट्रेनमधील चार प्रवाशी खाली उतरले. मात्र, ते चौघेही विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेनखाली सापडले आणि त्या चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आणि दोन चुलत भावांचा समावेश आहे.सागर संपत चव्हाण (वय २३), साईप्रसाद मनोहर चव्हाण (वय १७),मनोज दिपक चव्हाण (वय १७), दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (वय २०) अशी या तरुणांची नावे आहेत. अपघातानंतर चौघांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. यातील सागर चव्हाण हा कांदिवलीतील रहिवासी असून अन्य तिघे जण त्यांच्या घरी आले होते. अपघात घडला त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने अपघात नेमका कसा घडला, हे समजणे अवघड झाले आहे. चारही मृतदेह शताब्दी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहेत