पेण। रेल्वेस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात आणि शटल सेवा सुरू व्हावी यासाठी समस्त पेणकरांच्या वतीने पेण रेल्वेस्थानका बाहेर साखळी उपोषण करण्यात आले. या साखळी उपोषणाची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली नाही तर 8 दिवसांत कोणत्याही क्षणी रेल रोको करणार असल्याचे निवेदन पेणच्या नागरिकांच्या वतीने रेल्वे प्रशासनाला देण्यात आले. पेण हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आणि गणेशमूर्तींचे माहेरघर असूनदेखील आणि कोकण रेल्वेने पेणकरांच्या रेल्वेसाठी जमिनी घेऊनदेखील आजपर्यंत अनेक दशके होऊनही पेण रेल्वेस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नाहीत. लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात आणि पेण पनवेल शटल सेवा सुरू व्हावी, या प्रमुख मागण्यासह इतर प्रवासी मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने साखळी उपोषणाला बसले होते. यावेळी रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणा देऊन सर्व पक्षीय नेते, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, सर्व सामाजिक संस्थानी उपोषणाला पाठिंबा दिला. सदर आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या हेतूने सर्वानुमते ठराव घेऊन हे साखळी उपोषण स्थगित करून येत्या 8 दिवसांत कोणत्याही क्षणी रेल रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तशा प्रकारचे निवेदन रेल्वे प्रबंधक बी. एस. मीना यांना पेणकरांच्या वतीने देण्यात आले.
सर्वपक्षीयांसह नागरिकांचा पाठिंबा
या उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते योगेश म्हात्रे यांच्या सोबत स्वप्निल पाटील, दीपक पाटील, सुधाकर म्हात्रे हे बसले होते. या उपोषणाला नगराध्यक्षा प्रीतम पाटील, जिल्हा परिषद सभापती डी. बी. पाटील, नरेश गावंड, ओंकार दानवे, हरीश बेकावडे, नरेन जाधव, वैकुंठ पाटील, भास्कर पाटील, मंगेश नेने, पंकज शहा, बंडू खंडागळे, दयानंद भगत, समीर म्हात्रे, सुहास पाटील, दर्शन बाफना यांसह नागरिकांनी पाठिंबा दिला.