भुसावळ (चेतन चौधरी)। आशिया खंडातील दुसर्या क्रमांकाचे रेल्वेचे यार्ड असल्यामुळे भुसावळ शहर रेल्वेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. जंक्शन रेल्वे स्थानकासह प्रबंधक कार्यालय, पीओएच, एमओएच व क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण केंद्र हेे विविध विभाग येथष आहेत. या विभागांशी लाखो प्रवाशांसह हजारो कर्मचार्यांचा संपर्क येतो. देशाच्या अर्थसंकल्पात रेल्वे सुरक्षेसाठी 1 लाख कोटींची तरतूद आहे. मात्र याठिकाणी प्रवासी व कर्मचार्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेची अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उन्हाळ्यात रेल्वेच्या विभागांमध्ये आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात असे अनुभव असले तरी यासाठी नगरपालिका, आयुध निर्माणी किंवा दीपनगर औष्णिक वीज केंद्राच्या अग्नीशमन दलास पाचारण करावे लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनास काही एक सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
उघड्यावरच ज्वलनशील पदार्थांची साठवणूक
महिनाभरात रेल्वेच्या एमओएच आणि लोकोशेड विभागात भंगार साहित्याला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. याअगोदरही पीओएच, एमओएच शेडमध्ये वारंवार आग लागून रेल्वे प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रेल्वेच्या या विभागांमध्ये खराब डिझेल, जुन्या वायससह खराब विद्युत साधने उघड्यावरच साठविली जातात. उन्हाळ्यात तापमानाची तीव्रता वाढत असल्याने वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन डिझेलसारख्या ज्वलनशील पदार्थाने पेट घेतल्याने इतरही भंगार साहित्य जळाल्याचे प्रकार होत असतात.
आगीच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या वर्षी 17 एप्रिलरोजी पीओएच शेडमध्ये आग लागून लाखो रुपयांचे भंगार जळून खाक झाले. नंतर 15 डिसेंबर 16, 23 मार्च 2017, आता पुन्हा 19 रोजी लोकोशेडमध्ये आग लागून भंगार साहित्य जळून खाक झाले. या घटनांवरुन मात्र रेल्वेतील अग्निशमन सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून रेल्वे कर्मचार्यांची सुरक्षा वार्यावर असल्याचे दिसून आले आहे.
कॅगच्या अहवालात ठपका
रेल्वे गाड्यांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा ठपका ’कॅग’च्या अहवालातदेखील ठेवण्यात आला होता. आगप्रतिबंधक यंत्रणेचा अभाव काही ठिकाणी दिसून आला. कॅगच्या समितीने 2011 ते 2014 या कालावधीत रेल्वेच्या सर्व विभागांतील 14 वर्कशॉप, 38 डेपो, 138 गाड्या, 1089 कोच आणि 51 पँट्री आदी ठिकाणी पाहणी केली. रेल्वेतील आगीच्या घटनांचे प्रमाणे दुपटीने वाढल्याचे निदर्शनास येते. रेल्वेमध्ये आग झपाट्याने पसरते, त्यामुळे धोका संभवतो. भारताच्या महालेखापालांनी ठपका ठेवलेला असतांना या बेपरवाईला भूसावळचे महाव्यवस्थापक काय उत्तर देणार, हा प्रश्न महत्वाचा आहे.