लोणावळा/नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या सोमभद्रमध्ये शक्तिपुंज एक्स्प्रेसचे 7 डबे रुळांवरुन घसरले. ही गाडी हावड्याहून जबलपूरला जात असताना हा अपघात झाला. अपघातात जीवितहानी झाली नाही. गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. वेग कमी असल्याने अनर्थ टळला. या अपघातानंतर काही तासांतच दिल्लीतील शिवाजी पुलाजवळ रांची-राजधानी एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एकाच दिवसात घडलेली ही दुसरी रेल्वे दुर्घटना आहे. तर महिनाभरातील हा चौथा अपघात आहे. या दोन अपघातानंतर लोणावळ्याजवळील खंडाळा रेल्वेस्थानकाजवळ मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणारी मालगाडी ट्रॅकवरून खाली घसरून अपघात झाला. या अपघातात मालगाडीच्या सात वॅगन खाली उतरल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेक एक्स्प्रेस गाड्या तसेच मेल गाड्या यामुळे उशीरा धावत होत्या.
मुंबई-पुणे वाहतूक कोलमडली
गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास खंडाळा रेल्वेस्थानकाच्या काही मीटरआधी मालगाडी ट्रॅकवरून घसरली. खंडाळा घाटातून डाऊन लाईनने वर पुण्याच्या दिशेने येणार्या मालगाडीने खंडाळा बोगदा पार केला आणि ती खंडाळा रेल्वेस्थानकात शिरत असतानाच मालगाडीचे मध्य भागात असणारे सात वॅगन ट्रॅक वरून खाली उतरल्या. हा अपघात एवढा मोठा होता की एका वॅगनची चाके निघून ती वॅगन रेल्वेच्या मिडल लाईनवर पडली. तर मागील वॅगनच्या खाली असलेला रेल्वे रूळ आणि स्लीपर्स यांचे बर्यापैकी नुकसान झाले. तसेच काही रूळ उखडून गेले. या वॅगनच्या धडकेने बाजूला उभा असलेला एक वीज वाहक तारा असलेला खांबदेखील उखडून मिडल लाईनवर पडला. अपघातामुळे मध्य रेल्वेची मुंबई पुणे डाऊन लाईन वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाली तर एक वॅगन तसेच काही रेल्वेचे स्लीपर्स मिडल लाईनवर पडल्याने ती लाईनही वाहतुकीस बर्याच कालावधीसाठी बंद राहिली.
प्रभू गेले, गोयल आले तरी अपघात सुरूच!
हावडा येथून जबलपूरला निघालेली शक्तिपुंज एक्स्प्रेस गुरुवारी सकाळी सोनभद्र जवळील फफराकुंड स्टेशनजवळ रुळावरुन उतरली. दुसरीकडे, कानपूरजवळ कालिंदी एक्स्प्रेसही रूळावरून घसरताना थोडक्यात बचावली. तर, फर्रुखाबाद-फतेहगड दरम्यान रेल्वे रुळाचे तुकडे-तुकडे झाल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी लाल कपडा फडकवत या मार्गावरील रेल्वे रोखल्या. रेल्वे अपघातांच्या मालिकेनंतर सुरेश प्रभुंनी पंतप्रधानांनी भेट घेऊन राजनामानाट्य घडवून आणले होते. आता 3 सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात पियूष गोयल यांच्याकडे रेल्वेमंत्रिपद आले. मात्र नवीन मंत्र्यांना पदभार स्वीकारुन जेमतेम चार दिवस होत नाही तोच पुन्हा रेल्वे अपघातांची मालिका सुरू झाली आहे.