रेल्वे अपघातात मृत्यमुखी पडलेली ती मायलेकरे भोसरी बालाजीनगराची

0

पिंपरीत रविवारी झाला होता अपघात

पिंपरी-चिंचवड : पिंपरी रल्वे स्थानकात रविवारी (दि12) कोयना एक्स्प्रेसची धडक बसून दोन मुलांसह एक महिला जागीच मृत्यू पावली होती. अपघातानंतर 24 तास उलटूनही मृतांची ओळख पटली नव्हती. सोमवारी रात्री आठच्या सुमारास मृत महिलेच्या भावाने पिंपरी रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधून ही आपली बहीण आणि दोन भाचे असल्याचे सांगितले. अंजली विनोद रोडे (वय 30 रा बालाजीनगर,भोसरी) प्रेम विनोद रोडे (वय 7 ) मुलगी प्रिया विनोद रोडे (वय 10 ) अशी मृतांची नावे आहेत.

रुळ ओलांडतानाची घटना
अंजली तिच्या दोन मुलांसोबत पिंपरी येथे खरेदीला आली होती. पिंपरी येथे बस मधून उतरून मार्केटमध्ये जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून रेल्वे रुळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. लोकलच्या आडून जात असताना दुस-या रुळावरुन येणारी कोयना एक्सप्रेस तिला दिसलीच नाही. रुळावर येताच गाडी अंगावर येईल या भीतीने तिने घाबरून दोन्ही मुलांचे हात घट्ट पकडले. पण एका क्षणात गाडीने त्यांना धडक दिली आणि या धडकेत या माय लेकरांचा मृत्यू झाला.

पतीपासून विभक्त
अंजली गेल्या दोन-तीन वर्षापासून पतीच्या त्रासाला कंटाळून वेगळे रहात होती. तिचा भाऊ चिखली येथे राहतो. भावाच्या ओळखीने तिने चिखलीच्याच एका जीम मध्ये साफसफाईचे काम मिळवले होते . त्या पगारात ती आपल्या मुलांचे शिक्षण व आपला उदरनिर्वाह करीत होती. मात्र चूक अंजलीची होती. पाच मिनिटांचा वेळ वाचविण्यासाठी तिने केलेले रूळ ओलांडण्याचे धाडस तिच्या जीवावर बेतले. जीव धोक्यात न घालता प्रत्येकाने रेल्वेच्या नियमांचे पालन केले पाहिजे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.