रेल्वे गँगमनच निघाला चोर ; 80 किलो वजनाचा लोखंडी पार्ट जप्त

0

भुसावळ- रेल्वे मालकिची मालमत्ता चोरतानाच रेल्वे गँगमनसह अन्य एकाला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली. गँगमन नरेश बाबुराव गढवे (रा. पीओएच कॉलनी, पंधरा बंगला, भुसावळ) व मोनू रामेश्वर पांडेय (रा.गरूड प्लॉट, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून एक हजार 600 रुपये किंमतीचा व 80 किलो वजनाचा लोखंडी पार्ट जप्त करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी विना क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना रेल्वे यार्डातील आरपीएफ भगवती प्रसाद व पी.के.मिश्रा यांनी गाडी थांबवून चौकशी केली असता आरोपींनी सुरुवातीला रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगत रेल्वेच्या कामासाठी लागणारा पार्ट कामाच्या ठिकाणी नेत असल्याचे सांगितले. प्रसंगी आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, उपनिरीक्षक समाधान वाहुळकर यांना माहिती दिल्याने त्यांनीही तात्काळ यार्डात जात माहिती घेतल्याने चोरीचे बिंग उघडकीस आले. दोन्ही आरोपींविरूध्द रेल्वे अ‍ॅक्टनुसार रेल्वेच्या मालमत्तेची चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरपीएफ उपनिरीक्षक समाधान वाहुळकर हे पुढील तपास करीत आहे.