रेल्वे गाड्यांमध्ये पाण्याअभावी प्रवाशांची होतेय गैरसोय

0

भुसावळ । अमरावती, सुरत आणि कटनी पॅसेंजरमधील बेसीनची मोडतोड झाली असून शौचालयांमध्ये पाणी भरले जात नसल्याने गैरसोय होते, अशी प्रवाशांची ओरड आहे. याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. भुसावळ रेल्वे जंक्शन स्थानकावरुन दररोज सोडण्यात येणार्‍या अमरावती न्यू नरखेड, नाशिक – देवळाली, सुरत आणि कटनी पॅसेंजरमध्ये समस्यांचा उद्रेक झाला आहे.

प्रशासनाकडून दुरुस्ती होण्याची गरज
सध्या उन्हाळी सुट्या आणि लग्नसराई असल्याने पॅसेंजर गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, या गाड्यांमधील शौचालय आणि बेसीनमध्ये वापरण्यासाठी पाणी भरले जात नाही. काही डब्यांमध्ये बेसीनच्या नळांची मोडतोड झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून त्यांची वेळेत दुरुस्ती होत नाही.

घाण करणार्‍यांवर आळा घालण्याची आवश्यकता
पॅसेंजरमध्ये बेसिनचे नळांची तुटफूट झालेली आहे. त्यामुळे या नळांमधून पाणीच येत नाही. तसेच काही डब्यांमध्ये पाणी भरले जात नसल्यामुळे शौचालयात तसेच बेसिमध्ये पाणी येत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. याबाबत काही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार करुनही दुर्लक्ष कायम आहे. किमान गर्दीच्या मोसमात तरी रेल्वे प्रशासनाने नळांची दुरुस्ती करण्यात येऊन तसेच गाड्यांमध्ये पाणी भरण्यात येऊन सुविधा पुरवणे अपेक्षित आहे.

नियमित स्वच्छता हवी
पॅसेंजर गाड्यांसह एक्सप्रेस गाड्यांमध्ये देखील बेसिनची समस्या असते. यात प्रवाशी गुटखा थुंकत असल्यामुळे किंवा खरकटे अन्न धुत असल्यामुळे या बेसिनच्या जाळीत कचरा अडकून पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असतो. पर्यायाने हे पाणी बाहेर ओसंडून वाहत असल्यामुळे गाडी वेगाने सुरु असताना बेसिनमधील घाण पाणी हे याठिकाणी उभ्या राहणार्‍या प्रवाशांच्या अंगावर उडत असते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे बेसिनच्या स्वच्छतेकडे देखील रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.