रेल्वे जागेवरील अतिक्रमितांसाठी पर्यायी जागेसह निधीच्या मागणीसाठी शासनाला प्रस्ताव पाठवणार

0

पालिकेच्या सभेत एकमुखी निर्णय ; सरकारजमा झालेल्या भूखंडावर अतिक्रमितांचे पुर्नवसन करा -प्रा.सुनील नेवे यांची मागणी

भुसावळ- रेल्वे जागेवरील अतिक्रमितांसाठी पर्यायी जागेसह निधीच्या मागणीसाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्यासह शासनाकडून याबाबत मार्गदर्शन मागवण्याचा तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अल्पसंख्यांक समुदायासाठी अनुज्ञेय असलेल्या कामांसाठी खर्च अंदाज तयार करण्याच्या विषयाला बुधवारी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. प्रसंगी भाजपाचे सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी सरकारजमा झालेल्या भूखंडावर अतिक्रमितांचे पुर्नवसन करण्यासंदर्भात विचार व्हावा, अशी मागणी केल्यानंतर नगराध्यक्ष रमण भोळे यांनी अतिक्रमणग्रस्तांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे देण्यासाठी पडताळणी केली जाईल, असे आश्‍वासन सभागृहाला दिले. पालिकेच्या विशेष सभेत व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, गटनेता मुन्ना तेली, कर निरीक्षक देशपांडे उपस्थित होते.

आरपीडी रोड हस्तांतरीत करू नये -रवींद्र खरात
नगरसेवक रवींद्र खरात यांनी अतिक्रमितांना पालिकेने घरांसह सोयी-सुविधा पुरवाव्यात अशी मागणी करून डॉ.आंबेडकर रोडवरील दुकाने लावू देण्यासाठी अतिक्रमितांना परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

अतिक्रमित पालिकेचे मतदार -युवराज लोणारी
अतिक्रमित हे भुसावळ पालिकेचे मतदार असून त्यांना सोयी-सुविधा कायद्याच्या चौकटीत राहून पुरवाव्यात, असे नगरसेवक युवराज लोणारी म्हणाले. पालिकेने पाठपुरावा करून शासनाने जप्त केलेल्या जागांवर अतिक्रमितांचे पुर्नवसन होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत या संदर्भात आवाज उठवला असल्याचे सांगितले.

तर सरकारजमा जागांवर पुर्नवसन करा -प्रा.सुनील नेवे
बेघरांना न्याय देण्यासाठी पालिका व सत्ताधार्‍यांनी घेतलेली भूमिका स्तुत्य असून जिल्हाधिकार्‍यांकडे जागेसाठी मागणी करावी तसेच भुसावळातील सरकारजमा झालेल्या भूखंडांमध्ये कंडारीतील 177/2/1, भुसावळ शिवारातील 103/1, मिरगव्हाण शिवारातील 23, 99/1, 99/2, खेडी शिवारातील 18 व चोरवड शिवारातील 29 भूखंडांवर अतिक्रमितांचे पुर्नवसन करावे, अशी मागणी केली. या संदर्भात पाठपुरावा केला जाईल, असे आश्‍वासन नगराध्यक्षांनी दिले.
स्थानिकांना रेल्वे प्रकल्पात नोकरीसाठी प्राधान्य द्यावे अशी सुचनादेखील प्रा.सुनील नेवे यांनी मांडली. याप्रसंगी नगरसेवक प्रा.दिनेश राठी, सविता मकासरे, अरुणा सुरवाडे यांनी सुचना मांडल्या.

मुस्लीम बांधवांचे खडका रोड भागात पुर्नवसन करा -गटनेता
खडका रोड भागात घरकुल योजना राबवून मुस्लीम बांधवांना त्याचा लाभ द्यावा तसेच प्रधानमंत्री जनविकास योजनेंतर्गत दहा कोटींपर्यंतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी मागणी भाजपा गटनेता मुन्ना तेली यांनी केली.

पुष्पा सोनवणेंचा विषय का गांभीर्याने घेतला नाही -साधना भालेराव
रेल्वे हद्दीतील अतिक्रमण निघणार आहे हे तर दिड वर्षांपूर्वीच सभागृहाला माहित होते व पुष्पा जगन सोनवणे यांनी या संदर्भात सभागृहात आवाजदेखील उठवला होता मात्र ही बाब गांभीर्याने घेण्यात न आल्याने अतिक्रमितांना आज बेघर होण्याची वेळ आली असल्याचा आरोप जनआधारच्या नगरसेवका साधना रवींद्र भालेराव यांनी केला. यावर नगरसेवक लोणारी यांनी या प्रश्‍नावर राजकारण होत असल्याचे सांगून हा प्रश्‍न दिड वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगितले.

अतिक्रमितांना तात्पुरता पालिकेच्या जागा द्या -पिंटू कोठारी
अतिक्रमणधारकांना न्याय मिळण्यासाठी बैठक असलीतरी प्रत्यक्षात पालिका त्यांच्यासाठी काय करते आहे? असा सवाल नगरसेवक पिंटू कोठारी यांनी उपस्थित करीत तात्पुरता पालिकेच्या जागांवर अतिक्रमितांना राहू देण्याची परवानगी द्यावी व तत्पूर्वी बॉण्डवर हमीपत्र भरून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. अतिक्रमण धारकांना लागलीच जागा मिळणे व घरे बांधणे शक्य नसल्याने पर्यायी सोय पालिकेने करावी, अशी मागणी त्यांनी केली मात्र नगरसेवक लोणारी यांनी 2010 मध्ये ओपन स्पेस हस्तांतरणाचा अधिकार काढण्यात आल्याचे सांगितले.