एक लाख 17 हजारांची तिकीटे जप्त ; रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई
भुसावळ- नाशिकमधील पंचवटी परीसरात रेल्वे तिकीटांची काळाबाजारी करणार्या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून एक लाख 17 हजार 400 रुपयांची 47 तिकीटे जप्त करण्यात आली. अवैध रेल्वे तिकीटांचा काळा बाजार करणार्यांमध्ये या कारवाईने खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यातील हा तिसरा छापा असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त अजय दुबे यांनी गुरूवारी सकाळी 9.30 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अटकेतील आरोपींमध्ये जी.एस.टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे महेश शर्मा (29) व कैलाश गुप्ता (22) व श्रीनिवास गृह भंडारचे श्रीपाद भूतडा (39) यांचा समावेश आहे. आरोपींना मनमाड रेल्वे न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी केली कारवाई
नाशिक येथेदेखील ब्लॅकमध्ये तिकीट विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दुपारी दोन वाजेनंतर अचानक छापा टाकून दोघा दुकानातील तिकीटे जप्त करण्यात आली. दोन्ही ठीकाणी एकाच वेळी वेगवेगळ्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी छापा टाकून तिकीटे व संगणक, लॅपटॉप, पिंटर, मॉनेटर जप्त केले. यात एक लाख 16 हजार 380 रूपये किंमतीचे अवैध ई तिकीट जप्त केले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे विभागीय आयुक्त अजयकुमार दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण कस्बे, उपनिरीक्षक अंबिका यादव, उपनिरीक्षक समाधान वाहुलकर, मिलिंद तायडे, मनीष शर्मा, विनोद जेठवे आदींच्या पथकाने केली. आरोपींच्या ताब्यातून संगणक तसेच प्रिंटर आदी साहित्य जप्त करण्यात आले.
आतापर्यंत 17 दलालांना अटक
रेल्वे सुरक्षा बलाचे विभागीय आयुक्त अजयकुमार दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत स्वतंत्र 14 कारवायांमध्ये 17 दलालांना अटक करण्यात आली आहे. विशिष्ट सॉप्टवेअरद्वारे आरक्षित तिकीटे काढून त्यांची ब्लॅकमध्ये संशयीत विक्री करीत असल्याचा आरोप आहे.