रेल्वे प्रवाशांसाठी दुसरा रस्ता होणार

0

जळगाव। शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने आणि भुसावळ रेल्वे परिमंडळातील जळगाव रेल्वेस्टेशन हे मोठे जंक्शन असल्याने रेल्वेद्वारे प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरुन दररोज सरासरी 40 हजार प्रवासी प्रवास करतात. सध्या रेल्वे स्टेशनकडे येण्यासाठी व जाण्यासाठी केवळ एकच रस्ता आहे. प्रवासी व वाहनाच्या वर्दीळीमुळे या रस्त्यावरुन मार्ग काढणे कठीण होत आहे. यासाठी जळगाव रेल्वे स्थानक कडून शहरात जाणारा दुसरा पर्यायी रस्ता हवा अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त जीवन सोनवणे, पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्यासह रेल्वे प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी रेल्वे स्थानक परिसरातील जागेची पाहणी केली.

रेल्वे बंदची शक्यता
आमदार सुरेश भोळे व आमदार चंदु पटेल यांनी रेल्वे स्थानकाला लागुन एक नवीन रस्ता तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांची भेट घेतली आहे. दोंन्ही आमदारांनी मागणी लावुन धरल्याने विषयाचे गांभीर्य मोठे आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत तात्काळ कार्यवाही केली नाही तर लोकप्रतिनिधीकडून रेल्वे बंद आंदोलन करण्याची शक्यता असल्याचे देखील जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

रेल्वे प्रशासनाचा विरोध
प्रवाशांच्या सोयीसाठी दुसरा रस्ता तयार करण्यासंबंधी प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु ज्या ठिकाणाहुन नवीन रस्ता तयार होणार आहे त्या ठिकाणी सध्या वाहनांची पार्किंग केले जाते. नवीन रस्ता तयार झाल्यानंतर वाहन पार्किंगची समस्या निर्माण होईल तसेच पार्किंग सुविधेतुन मिळणारे उत्पन्न बंद होणार असल्याने रेल्वे प्रशासन नवीन रस्त्यासाठी जागा देण्यास विरोध दर्शवित आहे.

आठ दिवसात कळविण्याच्या सुचना
रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी तसेच येण्यासाठी एकच रस्ता असल्याने या रस्त्यावरील भार वाढला आहे. त्यामुळे वाहतुकींचा खोळंबा होवून त्यातुन मार्ग काढणे अवघड होते. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील या गर्दीचा त्रास सहन करावा लागला होता. येत्या 3 जुन रोजी पालकमंत्री जिल्हादौर्‍यावर असल्याने रेल्वे प्रशासनाने या बाबात आठ दिवसात कळविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी पाहणी दरम्यान दिल्या.

असा असणार रस्ता
रेल्वे स्टेशनच्या बाजुने असलेल्या संरक्षण भिंत जवळील पार्किंगच्या जागेपासून तर बीग बाझार परिसराजवळुन गोविंद रिक्षा स्टॉप पर्यत हा नवीन रस्ता असणार आहे. संरक्षण भिंत 12 मिटर तोडण्यात येणार असून खान्देश मिलजवळील गोविंद रिक्षा स्टॉप जवळ 24 मिटर जागा आसणार आहे. नवीन रस्ता तयार झाल्यास नेहरु पुतळ्या जवळील रस्ता फक्त येण्यासाठी तर नवीन रस्ता जाण्यासाठी असणार आहे. नवीन रस्त्यासाठी रेल्वे प्रशासन वगळता इतर कोणाचीही हरकत नाही.