रेल्वे प्रशासनाविरोधात तळेगाव ग्रामस्थांचे आंदोलन

0

तळेगाव : पुणे लोकल रेल्वेचे वेळापत्रक आणि व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पुणे रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या गैरसोयीचे निर्णय घेत आहे. त्याविरोधात तळेगावकरांनी रविवारी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.किशोर आवारे आणि सुशील सैंदाणे यंच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक ते वीरचक्र चौक या मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष सुनिल शेळके, नगरसेवक संतोष शिंदे, सचिन टकले, गणेश खांडगे, गणेश भेगडे, मिराताई फल्ले, कल्पना भोपळे, संग्राम काकडे, प्रमोद देशक यांच्यासह 500 ते 600 नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

अचानक लोकल बंद
रेल्वे प्रशासन दर रविवारी दुपारच्या वेळेत लोकल सेवा बंद ठेवत आहे. दररोज देखील काही लोकल अचानक रद्द करण्यात येत आहेत. मागील 2-3 दिवसांखाली आणखी एका आदेशाद्वारे रात्री अकरा वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणारी पुणे-तळेगाव लोकल बंद करण्यात आली. तसेच मध्यरात्री 12.05 वाजता तळेगाव स्थानकावरून सुटणारी तळेगाव-पुणे लोकल देखील बंद करण्यात आली आहे.

प्रवाशांना मनस्ताप
रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी नागरिकांना अशा प्रकारचा नाहक त्रास दिला जात आहे. केवळ लोकल फेरी फायद्याची नाही एवढे कारण पुढे करत या दोन लोकल फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. तळेगाव हे शहर पुणे-लोणावळा मार्गावरील एक महत्वाचे शहर आहे. औद्योगिक, पर्यटन आणि ऐतिहासिक शहर म्हणून तळेगाव शहराचा लौकिक आहे. या शहरातून पुण्याकडे व लोणावळ्याकडे प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे, तरी देखील फायदा होत नाही म्हणून लोकल फेर्‍या रद्द करण्यात येत आहेत.

प्रवाशांच्या विविध मागण्या
या मनमानी कारभाराला सवाल विचारण्यासाठी आणि लोकलच्या फेर्‍यांमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या असलेल्या नागरिकांसाठी नवीन रेल्वे रेक, एक्सप्रेस गाड्यांचा थांबा, स्थानिक नागरिकांसाठी जागृती चौकाकडून वीरचक्र चौकाला जोडणारा ’परस्पर नागरी उड्डाण मार्ग’ करण्यात यावा, सिंहगड एक्सप्रेसला तळेगाव थांबा देण्यात यावा यांसारख्या मागण्या आंदोलनात करण्यात येत आहे.