चंद्रपूर : चंद्रपूर – गोंदिया रेल्वे मार्गावर वाघिणीच्या बछड्यांचा मृतदेह आढळला आहे. आज पहाटेच्या सुमारास दोन बछड्यांचा मृतदेह रेल्वे ट्रकवर आढळला. जुनोना जंगल परिसरात सदरील घटना घडली आहे. हे बछडे २ ते ३ वर्षाचे असल्याचे सांगितले जात असून मृत बछडे अवनी वाघिणीचे असल्याचे संक्षय व्यक्त करण्यात आला होता. मात्र अवनी वाघिणीचे बछड्यांना नुकतेच पाहिले गेल्यामुळे हे बछडे तिचे नसल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान या बछड्यांचे मृतदेह वनखात्याला सोपवण्यात आले होते.
या अगोदरही घडल्या होत्या घटना
चंद्रपूर-गोंदियादरम्यान असलेला हा रेल्वे मार्ग जुनोना जंगलातून जातो. हे जंगल दाट असल्यामुळे येथे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. या रेल्वे मार्वावर रेल्वे गाड्यांची वाहतूकीचे प्रमाण वाढल्यामुळे रेल्वेला धडकून अनेक प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.
अवनीच्या बछड्यांना सुरक्षित पकडण्याचा प्रयत्न
दरम्यान अवनी वाघिणीचे दोन्ही बछडे वनअधिकाऱ्यांना आढळले आहे. अवनीची शिकार केली त्याच परिसरामध्ये २९ ठिकाणी या बछड्यांसाठी खाद्य ठेवण्यात आले होते. या खाद्यामुळे या परिसरात हे बछडे फिरत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या बछड्यांना सुरक्षित पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.