जळगाव । रेल्वे लाईन परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून मोबाईल चोरीचा अनोखा फेडा वापरला जात आहे. रेल्वे स्टेशनवरून गाडी सुटल्यानंतर थोडी पूढे गेल्यावर दरवाजात मोबाईल्वर बोलत असलेल्या प्रवाशाच्या हातावर काठी मारून मारून मोबाईल पाडला जातो. रेल्वे खाली मोबाईल पडताच काठी मारणारे मोबाईल घेवून पसार होतात. प्रवाशांना मोबाईलसाठी रेल्वे थांबविणे अथवा गाडीतून उतरणे शक्य होत नसल्याने चोरटे पसार होण्यास यशस्वी होतात. परंतू काठीचा मार लागल्याचे काही प्रवाशी रेल्वेतून खाली पडून जखमी होतात तर काहींना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी या गंभीर गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मोबाईल चोरट्यांची टोळी सक्रीय
रेल्वे लाईनवर असे प्रकार दररोज घडत आहेत. आतापर्यंत अनेकांचे मोबाईल याच पध्दतीने लंपास केले गेले आहेत. धावत्या रेल्वेत चोरी होण्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. रेल्वेत चोरी होण्याचे प्रकार नवीन नाहीत. भुसावळ नंतर जळगाव रेल्वे स्थानक हे वर्दळीचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे येथून ये-जा करणार्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. याचाच फायदा चोरटे घेत आहेत. सध्या शहरात अशा प्रकारे चोरी करणार्यांची टोळी सक्रीय झाली आहे. या संपूर्ण प्रकारात रेल्वेलाईनच्या शेजारीच असलेल्या गेंदालाल मील येथील टोळी मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. या परिसरातील काही चोरटे या धंद्यात गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत आहेत. रेल्वे स्थानक परिसरात होणार्या चोर्यांमध्येही याच भागातील चोरट्यांच्या टोळीचा हात असल्याचे काही वर्षांपूर्वीच उघड झाले होते.
मोबाईल चोरटे अशी करतात चोरी
जळगाव रेल्वेस्थानकालगत चोरी करणारे हे चोरटे रेल्वे प्लॅटफॉर्मपासून काही अंतरावर उभे राहतात. गाडी सुटल्यानंतर काही वेळ गाडीचा वेग कमी असतो. मुंबईकडे किंवा पुण्याकडे जाणार्या गाड्यांचा वेग भोईटे नगर जवळील रेल्वेगेटपासून तर सुरतकडे जाणार्या गाड्यांचा वेग माल धक्यापासून वाढतो. रेल्वेच्या अगदी शेजारी उभे असलेले हे चोरटे रेल्वेतील दरवाजात उभे राहून मोबाईलवर बोलणारे प्रवासी हेरतात. गाडीचा वेग कमी असल्याने त्या प्रवाशाच्या हातावर काडी किंवा पाण्याने भरलेली बाटली फेकली जाते. त्यामुळे अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशाच्या हातातील मोबाईल निसटतो आणि खाली पडतो. प्रवाशाला काही सुचण्याच्या आत गाडीचा वेग वाढलेला असतो. आणि डबा बराच पुढे निघून गेलेला असतो. त्यामुळे लागलीच हे चोरटे हा मोबाईल घेऊन लंपास होतात. त्यामुळे अशा चोरट्यांना अटक करण्याची मागणी होत आहे. परंतू रेल्वे पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे नाराजी व्यक्त होत आहे.
अन् गमवावा लागतो जीव..
चोरट्यांनी काठी मारल्यानंतर प्रवाश्याच्या हातातून मोबाईल खाली पडता. परंतू यात प्रवाशीही तोल जावून धावत्या रेल्वेतून खाली पडतो. यात प्रवाश्याला हाता-पायाला तर डोक्याला मार बसून गंभीर दुखापत होते. तर काहींचे हात-पाय कापले जातात. यातच एक ते दिड महिन्यापूर्वी रेल्वेच्या दरवाज्यात बसलेल्या तरूणाच्या हाताला काठी मारून चोरट्यांनी मोबाईल चोरला. मात्र, तरूण हा चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असतांना त्याचा रेल्वेखाली येवून पाय कापला गेला होता. यानंतर काल रविवारी नरेश जैस्वाल या तरूणाला चोरट्यांमुळे जीव गमवावा लागला आहे.