रेल्वे स्थानकावरील प्लॅस्टीक आणि थर्माकोलचा कचरा नाल्यालगत

0

नाला तुंबण्याची शक्यता : नदीपात्रातही होणार मोठ्या प्रमाणात प्रदूषण

भुसावळ- रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांच्या भोजनासाठी वापरल्या जाणार्‍या प्लॅस्टीक व थमार्र्कोलच्या थाळींची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता शहरालगतच्या नाल्याजवळ आणुन टाकले जात आहेत. परीणामी, पावसाच्या पाण्याने या पत्रावळ्या व थाळी नाल्याद्वारे वाहून तापी नदीच्या प्रदुषणात वाढ होईल. शिवाय या केरकचर्‍यामुळे नाले तुंबून शहरात पाणी पसरण्याची शक्यता भीती व्यक्त होत आहे.

रेल्वे स्थानकासह प्रवासी गाड्यातील कचरा उघड्यावर
भुसावळ रेल्वे जंक्श्नन स्थानकावर दिवसभरात मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वे गाड्यांची वर्दळ असते. यामध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासी रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना थर्माकॉलच्या थाल्यांमध्ये भोजन दिले जाते मात्र या भोजन थाल्यांची रेल्वे प्रशासनाकडून योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता स्थानकालगतच्या परीसरात टाकली जात आहेत. यामुळे रेल्वे स्थानकाच्या परीसरात अस्वच्छता निर्माण होते. याच प्रकारे जळगाव मार्गावरील रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतच स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर थर्माकॉल व प्लॅस्टीक कचरा मोठ्या प्रमाणात आणून टाकण्यात आला आहे. परीणामी हा कचरा पावसाच्या पाण्याने लगतच्या नाल्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. यामुळे नाला तुंबून परीसरातील रहीवाशांच्या घरात पाण्याचा शिरकाव होण्याची भीती व्यक्त होत आहे तसेच हा केरकचरा बल-बलकाशी नाल्याद्वारे तापी नदीपात्रात वाहून नदीच्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या प्रकाराने नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्यास हानीकारक असलेल्या केरकचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.

स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून संपुर्ण देशात व राज्यात स्वच्छ भारत अभियान राबवले जात आहे तसेच नागरीकांच्या आरोग्यास व पर्यावरणास हानीकारक असलेल्या प्लॅस्टीक थर्माकोलच्या वापरावर बंदी आणली आहे.अशा वस्तुंचा वापर व विक्री करतांना आढळून आल्यास शासनाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे.यामूळे या निर्णयाचे सर्व स्तरातुुन कौतूक होत असतांना रेल्वे प्रशासनाकडून मात्र पर्यावरणाला बाधक केरकचरा सांडपाण्याच्या नाल्यालगत आणून टाकला जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

पालिकेच्या आवाहनाला रेल्वे प्रशासनाचा ‘खो’
पावसाच्या पाण्याने नाले व गटारी केरकचर्‍यामूळे तुंबण्याचे प्रमाण वाढते. यामुळे पालिका प्रशासनाच्या माध्यमातून गटारी व नाले सफार्ईला प्राधान्य देण्यात आले असून शहरवासीयांना गटारी व नाल्यामध्ये केरकचरा न टाकण्याचे आवाहन केले जात आहे मात्र एकीकडे पालिकेची नाले सफाई मोहीम तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून पालिकेच्या आवाहनाला ‘खो’ देत केरकचरा नाल्याकाठी आणून टाकला जात आहे. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

रेल्वे प्रशासनाची प्लॅस्टीकमुक्ती नाहीच
राज्य शासनाने प्लॅस्टीक व थर्माकॉलच्या वापरावर बंदी घातली आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून राज्य शासनाच्या या बंदीकडे दुर्लक्ष होत असल्याचे विदारक चित्र दिसुन येत आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात असून रेल्वे प्रशासनाच्या या कारभाराबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात असून पालीका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने रेल्वे स्थानक परीसरातही कारवाईला प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.