रेल्वे हमालांचे विविध मागण्यांसाठी धरणे

0

जळगाव । रेल्वे स्थानकात प्रवाश्यांचे ओझे वाहणार्‍या परवानाधारक हमाल बांधवांना भारतीय रेल्वे कर्मचारी म्हणून गृप ’डी‘मध्ये समाविष्ठ करण्यात यावी या मागण्यांसाठी रविवारी जळगाव रेल्वे स्थानकाजवळील पार्सल कार्यालयासमोर हमाल बांधवांनी एक दिवशीय धरणे आंदोलन केले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंग्रजांच्या काळापासून हमाल  रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांच्या सेवेत काम करत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून काम करणार्‍या हमाल बांधवांना लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळात परवानाधारक कुली बांधवांना रेल्वेत समाविष्ट करून त्यांना रेल्वेच्या सर्व सुविधा मिळणार अशी घोषणा केली होती मात्र अद्यापर्यंत त्याची अंमलबजावनी झाली नसल्याने सर्व हमाल बांधवांमध्ये असंतोष पसरला आहे. आजच्या आधुनिक काळात स्वयंचलीत लिप्ट, अ‍ॅक्सीलेटर ब्रीज, बॅटरीवर चालणार्‍या लहान गाड्या, टॉली बॅग आदीसारख्या सुविधांमुळे कुली बांधवांच्या रोजगारावर गदा आली असून कुली ही संकल्पना बंद होण्याच्या मार्गावर आहे. दोन दिवसात केवळ 100 रूपये सुद्धा कमविणे शक्य होत नाही. अशा परीस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वे हमाल यांना रेल्वे प्रशासनात गृप डी श्रेणीची नोकरी द्यावी, 50 वर्षावरील वयोगटात असलेल्या हमालांना एक ठिकाणाची नोकरी द्यावी, शारिरीक कमकुवत असलेल्या हमालांना शिपाई, माळी किंवा वॉलमॅनची नोकरी द्यावी, अनुकंपनावर वडीलांच्या जागेवर नविन आलेल्यांना सुद्धा श्रेणी ‘डी’ मध्ये समाविष्ट करावी.