साकरीच्या संशयीताला पोलिसांकडून अटक ; न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी
भुसावळ- पॅरॉडाईस सर्व्हिसेस लि.नाशिक या कंपनीकडून ऑनलाईन रेशनकार्ड जोडणी स्मार्ट सेंटर व सुविधा सेंटर देण्याच्या आमिषाने तालुक्यातील साकरी येथील एकास 11 लाख 57 हजारात गंडवल्याप्रकरणी साकरी येथीलच एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
11 लाख 57 हजारांमध्ये गंडवले
भुसावळातील शिक्षक कॉलनीतील रहिवासी व ई सेवा केंद्र चालक असलेल्या संजय श्रीराम पाटील (50) यांच्याशी संशयीत आरोपी संदीप शामराव सपकाळे (35, रा.साकरी, ता.भुसावळ) याने सलगी वाढवून पॅरॉडाईस सर्व्हिसेस लि.नाशिक या कंपनीकडून ऑनलाईन रेशनकार्ड जोडणी स्मार्ट सेंटर व सुविधा सेंटर मिळवून देण्याचे आमिष दाखवत मार्च 2015 ते 6 नोव्हेंबर 2018 दरम्यान 11 लाख 57 हजार रुपये उकळले. तीन वर्षानंतरही काम होत नसल्याने तक्रारदाराने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने शहर पोलिसांकडे तक्रार अर्ज करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, प्रभारी निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांनी अर्जाची चौकशी करून 18 रोजी आरोपी संजय पाटीलविरुद्ध फसवणूक व पैशांचा अपहार केल्याने कलम 420 व 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर 19 रोजी आरोपीला अटक करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कोळी करीत आहेत.
आरोपीचा जिल्ह्यातील अनेकांना गंडा
संशयीत आरोपी संदीप सपकाळे यांनी रेशनकार्ड व सेतू सुविधा केंद्र मिळवून देण्याच्या आमिषाने भुसावळात सात जणांसह जिल्ह्यातील अनेकांना गंडा घातल्याचा संशय आहे. आरोपीचे स्वतःचे दीपनगरला सेतू सुविधा केंद्र असून या माध्यमातून त्याने अनेकांना गंडवले. पोलिसात सेतू सुविधा चालकांनी तीन महिन्यांपूर्वी तक्रार नोंदवली होती तेव्हा आरोपीने पैसे परत करण्याचे लेखी आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात रक्कम न दिल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.