साक्री । तालुक्यातील मैदाणे येथील रेशन दुकानाची चौकशी होऊन कार्यवाही करण्याबाबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, साक्री विधानसभा संघटक पंकज मराठे व मैदाणे ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांना निवेदन दिले. तालुक्यातील मैदाणे येथील साहेबराव पुंडलिक पाटील यांचे स्वस्त धान्य दुकान असून शासनाकडून होणार्या धान्य पुरवठाचा गैरव्यवहार करीत आहे. या बाबतीत तहसीलदार साक्री यांना निवेदन देऊन तक्रार दाखल केली होती. त्यानुसार तहसीलदार यांनी पिंपळनेर पुरवठा निरीक्षक यांच्याकडून अहवाल मागविला असता त्या अहवालानुसार सदर स्वस्त धान्य दुकानदार दोषी आढळून आले आहेत. धान्य पुरवठा करत असताना कार्डधारकाकडून पॉस मशीनची पावती स्वतःकडे ठेऊन घेतात व ग्राहकाला कच्ची पावती बनवून देतात.
साखर वाटप नाही
मागील महिन्यात साखर उचलली होती. परंतु ती साखर एकाही ग्राहकाला वाटप केली नाही. साखर काळ्याबाजारात पाठविण्यात येते. तसेच स्वस्त धान्य दुकानदार पाटील हे कार्डधारकाकडून प्रत्येकी 10 रूपये हमाली व वाहतुकीचे खर्च म्हणून अधिकचे पैसे घेत असतात. आदींच्या स्वाक्षर्या दुकानदाराचा मनमानी कारभार लक्षात घेता त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येऊन संबधित दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर मैदाणे सरपंच पंडित माळचे, करतारसींग बटवडा, शिवसेनेचे परशुराम देवरे, महावीर जैन, नितीन गायकवाड, नामदेव चौरे, रामदास बहिरम, गोटू चौरे, सुरेश चौरे, खुशाल चौरे, कैलास ठाकरे, सुनिल चौरे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.