जळगाव। जळगाव जिल्हा सरकारमान्य रेशनदुकानदार संघटनेतर्फे प्रलंबित मागण्या मान्य होण्यासाठी व वाधवा समितीच्या शिफारशी अंमलात आणाव्यात या मागणीसाठी जिल्ह्यातील रेशनदुकानदार व केरोसिन हॉकर्स धारकांचा प्रचंड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स संघटना फेडरेशनचे बाबुराव म्हमाणे(सोलापूर), आप्पासाहेब तोडकरी(सातारा), प्रदेश उपाध्यक्ष जमनादास भाटीया(जळगाव) आदींनी केले. रेशनदुकानदार व केरोसिन विक्री परवाना धारकांना शासकिय सेवेत समाविष्ट करावे, वाधवा समितीच्या शिफारशींची अमलबजावणी करावी तसेच चुकीची डाटा ऍन्ट्री करूनच ईपॉझ मशिन बसवावे, या प्रमुख मागण्यांसाठी बळीराम पेठेतील पत्रकार भवनापासून सकाळी 11 वा. मोर्चाचा प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी राज्य व जिल्ह्यातील संघटनेचे नेते, त्यापाठोपाठ महिला रेशनदुकानदार व त्यानंतर जिल्ह्यातील रेशनदुकानदार व केरोसिन हॉकर्सधारक सहभागी झाले होते.
दुकानदारांच्या या आहेत मागण्या
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता, आधुनिकीकरण आणणेसाठी राज्यातील रेशन दुकानांमध्ये बायोमॅटीक पध्दतीने धान्य वितरण करणेसाठी ई-पॉझ मशीन बसविण्यात आल्या आहेत. त्या मशीन हाताळणेसाठी रेशन दुकानदारास कमीत कमी दोन महिने प्रशिक्षण आवश्यक आहे, पुरवठा शाखेतील डाटा एन्ट्री अतिशय सदोष झाली असून त्यात रेशन कार्डधारकांचे आर.सी.नंबर नाहीत. जे आर.सी.नंबर आहेत त्या नंबरवर वेगळेच शाधापत्रिकाधारकांचे नाव दिसते म्हणून डाटा एन्ट्रीतील या त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. ई-पॉझ मशीन हाताळतांना रेशन दकानदारांना अडचणी येत आहेत, शासनाने मागील दोन वर्षापासून इआरसीएमएस या संकेत स्थळावर जी काही आधार सीडींग केली आहे ती एका खासगी मक्तेदारामार्फत करण्यात आली आहे. सदरची आधार सीडींग संपुर्ण जळगाव जिल्ह्याची एकाच ठिकाणी एकाच व्यक्तीला दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात चुकीची अधार सीडींग झालेली आहे. शासनाने इआरसीएमएस संकेत स्थळ बंद करुन इपीडीएस प्रणाली अस्तित्वात आणली. इआरसीएमएस मधील संपुर्ण माहिती कॉपी करुन इपीडीएस मध्ये टाकण्यात आली आहे. सबब सदरची माहिती मुळातच मोठ्या प्रमाणात चुकी झाल्यामुळे आम्हाला या कामासाठी अडचणी येत आहेत. आमचे असे निवेदन आहे की, या आधार सीडींगच्या कामासाठी शासकीय कर्मचार्यांमार्फतच नव्याने आधार सीडींग करुन बायोमॅटीक पध्दतीचा अवलंब केल्यास निर्दोष धान्य वाटप होईल. प्रशासन पारदर्शक, स्वच्छ करण्याचे कामी आम्ही सर्व रेशन दुकानदार सहकार्य करण्यास तयार आहोत. रेशन संदर्भात सर्वोच्च न्यायालय, दिल्लीचे आदेशानुसार वाधवा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करतांना रेशन दुकानदार परवानाधारकांना निदान स्वाभिमानाने, सन्मानाने जगता येईल अशी तरतुद करावी. राज्यातील रेशन दुकानदार परवानाधारकाला किमान चतुर्थ श्रेणी इतके मानधन मिळावे, रेशन दुकानदार परवानाधारकांकडून जे काही थोडेफार गैरप्रकार होत असतील, त्याला निश्चित आळा बसेल, महाराष्ट्र शासन, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि कार्डधारक जनता यातील अविभाज्य घटकाचे काम गेली 50 वर्षांपासून करीत आहोत.
मोर्चाचा मार्ग
हा मोर्चा जिल्हापरिषद, शास्त्री टॉवर, महात्मा गांधी मार्गाने नेहरू पुतळा, शिवतिर्थ मैदान, नविन बसस्थानक मार्ग, स्वातंत्र्य चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर एका शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांची भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदन स्विकारल्यानंतर रेशनदुकानदारांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले.
महिलांसह दुकानदारांचा मोर्चात सहभाग
शिष्टमंडळात बाबुराव म्हमाणे, आप्पासाहेब तोडकरी, जमनादास भाटीया, ज्योती भाटीया, सुभाष जैन, प्रशांत भावसार, लियाकत खान, सलीम रंगरेज(पाचोरा), हिमांशू तिवारी, शुभागी बिर्हाडे, इंदुताई ठाकूर, रिटा सपकाळे, पंकज भावसार, अतुल हराळ, सुभाष पांडे यांच्यासह जिल्ह्यातील 1200 रेशनदुकानदार व केरोसिन हॉकर्सधारक उपस्थित होते. तसेच या मोर्चात जळगाव शहरासह जिल्ह्यातील शेकडो रेशनदुकानदारांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या मोर्चात महिला रेशनदुकानदारांनी उस्त्फूर्तपणे हजेरी नोंदविली. त्यात प्रामुख्याने ज्योती भाटीया, हुमैरा शेख, मयुरी चौधरी, रत्नमाला काळुंखे, रामेश्वरी शर्मा, भारती पाटील, रत्ना शिंपी, आशा जावळे, सरलाबाई पाटील, ताराबाई भोसले, विमलबाई पाटील, रेखा पाटील यांचा समावेश होता.
नियोजनबध्द व शिस्तप्रिय मोर्चा
मोर्चा म्हटला की, साधारणपणे गगनभेदी घोषणा व शासनाविरूध्द हल्लाबोल करण्यात येतो, मात्र रेशनदुकानदारांच्या आजच्या मोर्चात या अनिष्ठ प्रथेला फाटा देण्यात आला.अग्रभागी असलेल्या रिक्षावर स्पीकरद्वारे मागण्यांचा घोष करण्यात येत होता व मोर्चात सहभागी रेशनदुकानदारांच्या हातात मागण्यांचे फलक देण्यात आले होते. तसेच मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर कोणतीही घोषणाबाजी करण्यात आली नाही. एक नियोजनबध्द व शिस्तप्रिय मोर्चा म्हणून नागरीकांनी या मोर्चाचे कौतुक केले. तसेच या मार्चात असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. तर मार्चामुळे शहर दणाणुन गेले होते.