रेशन दुकानांवर तूरडाळ, साखर उपलब्ध नाही

0

पुणे : दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड 1 किलो याप्रमाणे साखर तसेच चणा आणि उडीद डाळ मिळणार आहे. मात्र, दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही अद्यापही रेशन दुकानांवर तूरडाळ आणि साखर उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे गोरगरीब कुटुंबांना डाळ आणि साखरेविना दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर आणि मागेल त्या प्रमाणात तूर किंवा उडीद डाळ देण्याची घोषणा चार दिवसांपूर्वी केली आहे. त्यानुसार शहरातील अंत्योदय आणि प्राधान्य गटात असलेल्या 3 लाख 65 हजार 283 शिधापत्रिकाधारकांना प्रतिएक किलोप्रमाणे साखर मिळणार आहे. पुणे अन्न धान्य वितरण विभागातर्फे पुण्यातील शिधापत्रिका लाभधारकांच्या संख्येनुसार 2 हजार 618 क्विंटल साखरेची मागणी केली असता शासनातर्फे 2 हजार 713 क्विंटल साखर मंजूर करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी शासनाकडून 1 हजार 220 क्विंटल साखर प्राप्त झाली आहे. परंतु, अंत्योदय आणि आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची संख्या पाहता साखर पुरणार नाही.

शिधापत्रिकाधारकाला प्रत्येकी 1 वा त्याच्या मागणीनुसार 35 रुपये किलो दराने तूरडाळ आणि उडीद डाळ विक्री करण्यात येणार आहे. कार्डधारकांच्या संख्येनुसार 169 मेट्रिक टन तूरडाळ, उडीद डाळ 85 मेट्रिक टन अशी मागणी केली आहे.त्यानुसार मान्यता मिळाली असली तरी पुढील आठवड्याभरापर्यंत या दोन्ही डाळींचा पुरवठा होणार आहे. तोपर्यंत दिवाळी संपणार आहे.