तलम वस्त्र म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते रेशीम… रेशीम भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. याचे दाखलेच द्यायचे झाले तर अगदी सातवाहन काळापर्यंत मागे जाता येते. भारतातून ग्रीक आणि रोमन या सभ्यतेला आपल्या कडून हे अतिउच्च प्रतिचे वस्त्र पुरविले जायचे. सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान नगरीतून पैठणीची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याचा उल्लेख आहे. आता राज्य शासनाने वाईत रेशीम पार्क तयार केला आहे. त्या पार्कचा लेखाजोखा… जिल्हा रेशीम कार्यालयाची स्थापना रेशीम संशोधन केंद्र म्हणून वाई येथे सन 1958 रोजी करण्यात आली.
सन 1980 सालापर्यंत वाई हे महाराष्ट्रातील रेशीम उद्योगाचे मुख्यालय होते. रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसार व्हावा हा मुख्य उद्देश ठेऊन स्थापन केलेल्या उद्योगामध्ये रेशीम उद्योगामधील वेगवेगळ्या रेशीम किटकांच्या जाती, तुतीच्या जाती यावर संशोधनही झाले. महाराष्ट्र हे रेशीम उद्योगासाठी अपारंपारीक राज्य असल्याने केंद्रीय रेशीम मंडळाच्या सहाय्याने येथे रेशीम उद्योगाच्या विस्तारासाठी प्रशिक्षण पथदर्शक फार्म, रिलींग केंद्र, कापड विक्री, शेतकरी – विद्यार्थी प्रशिक्षण व देशविदेशातील पर्यटक भेटी अशा विविध पातळीवरील कार्यरत असणारे महाराष्ट्रातील केंद्र सिल्क व्हॅली म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या दशकापासून जिल्ह्यातील या केंद्रावर मोठ्या प्रमाणात रेशीम क्रांती झालेली आहे. रेशीम शेतकर्यांनी या उद्योगाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या जिल्ह्यात 311 रेशीम उद्योजक शेतकरी 319 एकर क्षेत्रावर मानकानुसार रेशीम कोषांचे उत्पादन घेत आहेत. त्यांना सुधारीत तुतीच्या जाती व कोषांच्या जातींचा अंडीपुंज पुरवठा जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत केला जातो. हे केंद्र अजूनही जुन्या वास्तू व साधनसामुग्रीवर चालू आहे. या रेशीम केंद्रावर दरवर्षी सर्वसाधारण 10 ते 15 हजार पर्यटक, विद्यार्थी, शैक्षणिक सहली, विदेशी पर्यटक आवर्जुन भेट देतात. रेशीम उद्योगाची माहिती घेतात व कुतुहलाने कापड व संपूर्ण रेशीम प्रक्रियेची माहिती मागतात जी सर्वतोपरी दिली जाते. जिल्हा रेशीम कार्यालय, वाई जि.सातारा येथील म्युझीयम/ चलचित्रगृहामध्ये लहान अळी संगोपानापासून ते रेशीम कापड तयार करणे पर्यंत संपूर्ण यंत्रणा उभी करण्याचे काम चालू आहे. सदर काम हे तीन टप्यांणयमध्ये करण्याचे नियोजित आहे. प्रथम टप्यार्मध्ये चलचित्रगृह तयार करण्यात आले आहे. यामध्ये रेशीम कार्यालय, वाई येथील उपलब्ध जागेतील प्रोजेक्टर लावून रेशीम उद्योगासंदर्भात परिपूर्ण माहिती दाखविण्यात येते.वाई रेशीम पथदर्शक फार्मवर उपलब्ध असलेल्या जुन्या 3500 स्के.फुट इमारतीचे नुतनीकरण करुन संग्रालय निर्मिती केली आहे.
निसर्गातील चारही प्रकारचे रेशीम म्हणजेच 1) तुती रेशीम 2) टसर रेशीम 3) एरी रेशीम 4) मुगा रेशीम या जातींचे कोष कापडप्रक्रिया दुर्मिळ मशिनरी, पुस्तके माहितीपत्रक, भिंत्तीचित्रे व कापड इत्यादी प्रकारचे दालन तयार करुन संग्रहीत करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे रेशीम शेतकरी, उद्योजक, पर्यटक व विद्यार्थी यांना रेशीम उद्योगाची संपूर्ण माहीती याद्वारे देण्यात येईल. सदर म्युझीयममध्ये कोष खरेदी प्रक्रिया कोष शिजविणेची प्रक्रिया उपलब्ध असलेल्या कॉटेज बेसीन मशिनवर धागा तयार करणे, रि-रिलींग करणे, लडी तयार करणे, ट्विस्टींग करणे व हातमागावर कापड तयार करणे इत्यादी प्रात्यक्षिके उभी करण्यात येत आहेत. त्याचबरोबर टसर कोषापासून धागा निर्मितीचे मशीनसुद्धा उभारण्यात आले आहे.
– युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा