रेसकोर्सवरील थीम पार्कचे स्वप्न अपुरे राहणार

0

मुंबई । मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क बनवण्याचे स्वप्न होते. मात्र, भाडेपट्टा कराराचे नुतनीकरण व नवीन अट अंतर्भूत करावयाचे असल्यास तर त्याचे अधिकार सक्षम प्राधिकरणास असणार असून त्याची पूर्व परवानगी शासनाची असणार आहे. सरकारच्या या नव्या जीआरमुळे आता महापालिकेला नुतनीकरण करता येणार नाही. त्यामुळे रेसकोर्सवरील आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिमपार्क उभारण्याचे शिवसेनेचे स्वप्न आता अपूरे राहण्याची शक्यता आहे.

सोन्याची अंडी देणार्‍या पालिकेचे जवळपास 4 हजार भूखंड भाडे कराराने दिले आहे. यातील 236 भूखंडाचे नुतनीकरण 2013 ला संपले आहे. करार संपूनही महापालिकेने हे भूखंड अद्याप ताब्यात घेतलेले नाही. यातील अनेक भूखंडावर कराराचा भंग करून अनधिकृत बांधकाम केले आहे. महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठरावाची सूचना मांडून रेसकोर्सचा भूखंड महापालिकेने ताब्यात घेण्याची सूचना केली होती. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहरात देश विदेशातुन पर्यटक येत असतात. त्यामुळे शहरात जागतिक दर्जाचे उद्यान होण्याची गरज आहे. घोड्यांच्या शर्यतीसाठी वापरण्यात येणारा हा भुखंड महापालिकेने त्वरीत ताब्यात घेऊन त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान निर्माण करावे अशी मागणी शेवाळे यांनी केली होती.

रेसकोर्स मैदान रॉयल वेस्टर्न इंडिया टर्प क्लब या कंपनीला 99 वर्षाच्या लिजवर दिला होता. मात्र ही लीज करार कधीच संपला आहे. माजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्यासाठीचे पत्र दिले आहे. त्यामुळे कंपनीसोबत नव्याने लीज करार करायचा की थीमपार्क उभारायचे याचा सल्ला घेण्यासाठी राज्य सरकारकडे अहवालही पाठवण्यात आला आहे. रेसकोर्सवरील 75 टक्के जमीन राज्य सरकारची व उर्वरित महापालिकेची आहे. त्यामुळे नुतनी करण व त्यात बदल करावयाचा असल्यास राज्य सरकारची मंजुरी मिळणे आवश्यक होते.