रोजगारक्षम अभियांत्रिकीसाठी सँडविच कोर्स महत्त्वाचा- वेलणकर

0

अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेवर आधारित व्याख्यान

पिंपरीः अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शिक्षण चालू असताना औद्योगिक तंत्रज्ञानाची तोंड ओळख होणे गरजेचे आहे. हे शिक्षण कौशल्याधिष्ठीत असणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने डॉ. बाटु विद्यापीठाने सुचविलेले बी. टेक अभ्यासक्रम परिपूर्ण वाटतात. सातत्यपूर्ण मूल्यमापन असल्याने वर्षे वाया जाण्याची भीती नसते. जागतिक स्तरावर अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचे स्वरूप पाहता भारतातील अभियंते रोजगारक्षम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणामध्ये इंटर्नशिप, सँडविच पद्धतीची शिक्षण व्यवस्था अपेक्षित आहे. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष तांत्रिकी कामाचा अनुभवही बी.टेकची पदवी देऊ शकणार आहे. जागतिक स्पर्धेसाठी सक्षम अभियंते या प्रक्रियेतून तयार होणार आहेत, असे मत करिअरतज्ज्ञ विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले. येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आयोजित अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया या विषयावरील व्याख्यानात ते होते.

प्रात्यक्षिक ज्ञानाची गरज
डॉ. ललितकुमार वधवा यांनी बाटु विद्यापीठातील अभियांत्रिकीचे महत्त्व विशद केले. त्यासोबतच अभ्याक्रमातील कौशल्याची जोपासना करणार्‍या विविध पैलूंचा आढावा घेतला. प्रा. विजय नवले यांनी अभियांत्रिकी करिअर या विषयावर प्रास्ताविक केले. तसेच अभियांत्रिकीनंतर, संशोधन आणि उद्योजकता या दोन महत्त्वपूर्ण संधीसाठी प्रात्यक्षिक ज्ञानाची गरज असल्याची माहिती प्रा. विजय नवले यांनी दिली. या वेळी तिसर्‍या फेरीतील ऑप्शन फॉर्म कसा भरावा या विषयाचे मार्गदर्शन प्रा. मनीषा देशपांडे यांनी केले. तसेच प्रवेशासाठीची ही बहूमूल्य संधी असल्याने ऑप्शन फॉर्म मधील चुका टाळाव्यात, असे देखील त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास तळेगाव येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले, प्रा. मनिषा देशपांडे आदी उपस्थित होते.